तुळशी वृदांवनात जिवंत काडतुसे नि सोने…संतोष लड्डा दरोडाप्रकरणात नवीन ट्वीस्ट, अमोल खोतकरच्या बहिणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Rohini Khotkar Arrested : छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. या दरोड्यात साडेपाच किलो सोने आणि 30 किलो चांदी चोरीला गेली होती. दरोड्याचा सूत्रधार अमोल खोतकराच एन्काऊंटर झाला होता. आता प्रकरणात अजून एक ट्विस्ट आला आहे.

Santosh Ladda Robbery Case : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूजमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा पडला होता. या दरोड्यात साडेपाच किलो सोने आणि 30 किलो चांदी चोरीला गेली होती. पुढे तपासादरम्यान दरोड्याचा सूत्रधार अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला होता. त्याची बहीण रोहिणी खोतकर हिने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांनी अमोलचा खून केल्याचा आरोप केला होता. प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोहिणी खोतकर हिच्या घरात सोने आणि जिवंत काडतूस सापडले आहे.
काडतुसे आणि सोने
रोहिणी खोतकर हिने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. घराची झाडाझडती घेतल्यावर पोलिसांना मोठे यश आले. तुळशी वृंदावनातून पोलिसांनी सोने आणि काडतुसे हस्तगत केली. तर इतर ठिकाणाहून पण काडतुसे मिळवली. या झाडाझडतीत खोतकरच्या घरातून 22 तोळे सोने आणि 7 जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी रोहिणी खोतकर हिला अटक केली आहे.
30 किलो चांदीचा सांगितला होता ठावठिकाणा
विशेष म्हणजे रोहिणी खोतकर हिने दरोड्यात चोरी झालेली 30 किलो चांदी एका गॅरजेमधील गाडीत असल्याची टीप दिली होती. आपल्यावरील पोलिसांचे लक्ष हटवण्यासाठी तिने ही खेळी खेळल्याचे समोर येत आहे. या दरोड्याविषयी रोहिणीला अजून काही माहिती आहे का? या बाबी समोर येतील.
काय आहे प्रकरण
छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. 7 मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. 15 मे रोजी रात्री 2 ते 4 या दरम्यान 6 दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी असा 6 कोटींचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी तपासानंतर अमोल खोतकरला अटक करण्याचा प्रयत्न केला होता. 27 मे 2025 रोजी भल्या पहाटे त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले होते. तो पळून जाण्याच्या बेतात होता. त्याने पोलिसांच्या अंगावर गोळीबार केला. कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये अमोल ठार झाला. तर आता त्याच्या बहिणीला पोलिसांनी अटक केली आहे.
