Chhatrapati Sambhajinagar: जिल्हा परिषद निवडणुकीत मराठा आरक्षणाचा तडका! नव ओबीसींची लाट, इतके नव OBC निवडणुकीच्या मैदानात
Chhatrapati Sambhajinagar ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत डावपेच सुरू असतानाच आता या निवडणुकीत एक नवीन घडामोड समोर आली आहे. मराठा आरक्षणामुळे नवीन ओबीसींची लाट निवडणुकीच्या मैदानात आली आहे. नवीन ओबीसी निवडणुकीच्या मैदानात नशीब आजमावणार आहेत.

Chhatrapati Sambhajinagar ZP Election New OBC Candidate: राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत यंदा ट्विवस्ट आला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत डावपेच आखल्या जात आहेत. भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान इतर पक्षांसमोर आहे. विधानसभेपासून महायुतीमधील भाजप आणि शिंदेसेनेचा झंझावत कमी झालेला नाही. त्यात भाजपने मोठी हनुमान उडी घेतली आहे. आता जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजप मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. त्यापूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यात नवीन ओबीसींची लाट आली आहे. आता हे नवीन ओबीसी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्याचा आगामी राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काय आहे ती अपडेट?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७० नवओबीसी उमेदवार रिंगणात
मराठा आरक्षणासाठी झालेल्या राज्यव्यापी आंदोलनानंतर निर्माण झालेला सामाजिक बदल आता थेट जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत स्पष्टपणे दिसून येत आहे. १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र मिळालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तब्बल ७० नव ओबीसी उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उमेदवारी दाखल करून नशीब आजमावले आहे.
नव ओबीसींची पहिलीच निवडणूक
जिल्हा परिषदेत ओबीसीसाठी राखीव असलेल्या १७ जागांसाठी ३१, तर पंचायत समितीच्या २९ गणांसाठी ३९ नव ओबीसी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.विशेष म्हणजे भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या प्रमुख राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांनीही या नव ओबीसी उमेदवारांना संधी दिली आहे.
राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये कळीचा ठरला होता.त्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जुन्या नोंदींचा सखोल अभ्यास केला.ऑक्टोबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील १ हजार ८८४ गावांमधील नोंदी तपासण्यात आल्या. यामध्ये मराठवाड्यातील २ लाख ५६ हजार ५०५ व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.आरक्षण मिळालेल्यांपैकी अनेकांनी आता या सामाजिक बदलाचे राजकीय प्रतिनिधित्व करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला असून, याचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
