‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

Abhijeet Dipke Hunger Strike: आज पहाटे दिल्लीतील जंतरमंतरवर मोठी घडामोड घडली. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उपचारासाठी उचलले. तर अभिजीत दीपके यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्ट करत त्याने आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यावर अभिजितच्या आई-वडिलांनी मोठी प्रतिक्रिया दिली.

आमचा जीव कसा लागणार? अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?
अभिजीत दीपके, भगवानराव दीपके, अनिता दीपके
| Updated on: Jul 18, 2026 | 12:12 PM

ज्ञानेश्वर लोंढे, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी : आज सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21 वा दिवस होता. पहाटेच पोलिस जंतरमंतरवर दाखल झाले. त्यांनी तातडीने वांगचुक यांना उचलून रुग्णालयात उपचारासाठी नेले. यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला. मोठा गोंधळ उडाला. पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केला. तर आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी आमरण उपोषणाची घोषणा केली. या सर्व घडामोडींवर अभिजितच्या आई-वडिलांनी (Bhagwanrao Dipke- Anita Dipke reaction) समोर येत मोठी प्रतिक्रिया दिली.

सरकार दखल घेत नाही

NEET परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी अभिजीत लढा देत आहे. त्याच्या नातेवाईक अथवा नात्यातील भावा-बहि‍णींसाठी तो लढत नाही. तो सर्वांसाठी लढा देत आहे. पण सरकार या आंदोलनाची कुठलीच दखल घेत नसल्याचा आरोप अभिजितची आई अनिता दीपके यांनी केला. तो धडपड करत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तो लढा देत आहे. 6 जून रोजी तो अर्धा तास तो घरी आला. सोनम वांगचुक यांना सरकारने उचलून नेले, हे चुकीचे केले आहे. सरकारला एकच सांगणे आहे की, मुलांचे म्हणणे ऐकून घ्या. त्याचे वडील दवाखान्यात दाखल होते, गेल्या शनिवारी अभिजीतशी बोलणे झाले. अशात त्याच्याशी बोललो नसल्याचे आईने सांगितले.

आमचा जीव कसा लागणार?

अभिजीत आमरण उपोषणाला बसला आहे, आमचा जीव कसा लागणार? असे म्हणत त्याच्या आईचा कंठ दाटून आला. आज सोनम वांगचुक यांना नेले. उद्या त्यालाही असेच उचलून नेले तर आम्ही काय करणार? वांगचुक यांना सकाळीच झोपेतून उचलून नेले. उद्या अभिजीतबाबत असेच झाले तर आम्ही काय आणि कुणाकडं न्याय मागणार असा सवाल अभिजीतची आई अनिता दीपके यांनी विचारला. त्यांनी मुलाविषयी मोठी चिंता व्यक्त केली.

ही तर हुकुमशाही झाली ना

ते लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. तिथे कुठलीही हिंसा झाली नाही. जनता त्यांच्या बाजूने होती. दिल्ली आणि देशातील अनेक जण दिल्लीत त्यांची काळजी घेत होता. सरकारने सोनम वांगचुक यांना अशा प्रकारे अचानक उचलून न्यायची गरज नव्हती. सरकारने प्रतिनिधी पाठवून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. ही तर हुकुमशाही झाली ना. वांगचुक हे मोठे वैज्ञानिक आहे. त्यांनी देशाचा विचार करून उपोषणाला बसले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी पाठिंबा दिला. वांगचुक यांना उचलून नेले म्हणजे हे आंदोलन संपून जाईल असे सरकारला वाटत होते. सरकारला हे आंदोलन मोडून काढायचे आहे. त्याला अमेरिकेत चांगली नोकरी मिळत होती. मी ही त्याला सांगितलं होतं की भारतात गढूळ वातावरण झालेले आहे, इकडे येऊ नको. राम मंदिर सोडलं नाही तर इतर माणसांची काय चिंता आहे या देशात? पण त्याने ऐकले नाही, असे अभिजीतचे वडील भगवानराव दीपके यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सरकारच्या भूमिकेवर परखड मत व्यक्त केले.

शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

सरकारला मला काही सांगायचं नाही, नरेंद्र मोदी यांना देवाने सद्बुद्धी द्यावी की विद्यार्थ्यांचं ऐकण्याची सद्बुद्धी द्यावी. वडील म्हणून कोणालाही मुलाची चिंताच वाटते मला जशी मुलांची चिंता वाटते, तशी नरेंद्र मोदींना त्यांच्या विद्यार्थी हे मुलं म्हणून त्यांना चिंता वाटायला पाहिजे त्याच्यात गैर काय आहे. भिण्याचे काही कारण नाही जन्मजात यांच्या बापाची खुर्ची नाही, हे किती वर्षे तिथे जाणार ही लोकशाही आहे पाच वर्षांनी सत्ता फ्लॅट होते हे आपण बघितलं आहे. एखाद्या मंत्र्यांना काढलं असतं तर यांचे काही मंत्रिमंडळ कोसळत नव्हतं. सर्वांनीच आता सरकारच्या विरोधात रस्त्यावर आले पाहिजे, असे आवाहन अभिजीत दीपके यांचे वडील भगवानराव दीपके यांनी केले.

आम्ही सुद्धा उपोषणाला बसणार

अभिजीत दीपके उपोषणाला बसला आहे. आम्ही सुद्धा त्याच्या आंदोलनात सहभागी होऊ. मला एकच मुलगा आहे तो जर उपोषणाला बसला तर मी इथे बसून काय करणार, अशी प्रतिक्रिया अनिता दीपके यांनी दिली. तर मी पण उपोषणाला जाणार आहे सरकारला काळजी नाही मात्र आम्हाला आमच्या लेकराची काळजी आहे, असे भगवानराव दीपके म्हणाले.

Follow Us