Sanjay Shirsat: मराठवाड्यात शिंदे सेनेने भूमिका बदलली, सतीश चव्हाण यांना पुन्हा पाठिंबा, तन-मन-धनाने काम करणार
Sanjay Shirsat on Satish Chavan: मराठवाडा पदवीधर निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली. त्यांनी सतीश चव्हाण यांना पुन्हा पाठिंबा जाहीर केला. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीचा जीव भांड्यात पडला. तर अमरावतीमधील कुरबुर थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sanjay Shirsat on Marathwada Graduates Constituency: पुण्यानंतर मराठवाड्यातही शिंदे सेना वेगळी भूमिका घेणार अशी चर्चा रंगलेली असतानाच अखेर पेल्यातील वादळ शमले. मराठवाडा पदवीधर निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा मंत्री संजय शिरसाट यांनी केली. त्यांनी सतीश चव्हाण यांना पुन्हा पाठिंबा जाहीर केला. वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर महायुतीमधील मतभेद संपल्यांचे त्यांनी सांगितले. निवडणुकीमध्ये विश्वास महत्त्वाचा आहे. राजकारणात एकदा शब्द दिल्यावर त्या शब्दाचा पालन झालं पाहीज अशी अपेक्षा वरिष्ठ नेत्यांना असते. एवढे करून तरीही बंडखोर उभे राहतच असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे हा एकमेव पर्याय नेत्यांकडे राहतो, असे ते म्हणाले.
आज सुनेत्रा पवार यांच्या मराठवाड्यात दोन सभा
आज मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दोन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड आणि बीड येथे या सभा होतील. दरम्यान आज सकाळी दहा वाजता उमेदवार सतीश चव्हाण यांनी तातडीने पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निवासस्थान गाठले. त्यानंतर दोघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात महायुतीमधील वाद, मतभेद संपले आहेत. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाचही निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या पाठीशीच उभे राहण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे त्यांनी जाहीर केले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात सतीश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना तन मन आणि धनाने काम करेल, असे आश्वासनही शिरसाट यांनी दिले. ठाकरेंच्या पहिल्यापासून धोरण एकटा चलो रे आहे. या मुळे इथे मविआ चा अंत राहिला आहे. कुणालाही सोबत राहायचं नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
मंत्रिमंडळ फेरबदलावर काय उत्तर?
अजून आमच्याकडे अशी माहिती नाही, सर्व काही अलबेल आहेत. अशा चर्चा नेहमी सुरू होतात असे शिरसाट म्हणाले. राष्ट्रवादीने अर्थखाते देण्याच्या मागणीवर बोलताना त्यांच्या आमदार यांनी केलेली मागणी आहे. त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. तिन्ही नेते जो निर्णय घेतील तो निर्णय खालील सर्व नेते मान्य करतील, असे शिरसाट म्हणाले.
अंतरवाली गाव दत्तक घेणार
मंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्यातील पालकमंत्री आहेत, त्या अंतरवाली गाव दत्तक घेत असतील तर चांगले आहे. ते गाव चांगले करणे त्यांचे उद्देश असेल तर चांगले आहेत. गावकरी त्यांना मदत करतील. तर दीपके हे दररोज आंदोलन करून लोकांना का त्रास देत आहात. एकदा ठरवा कधी आंदोलन करायचे. तुम्हाला कुणीही अडविले नाही संविधानाने अधिकार दिला आहे. काही अतिरेकी हल्ले इत्यादी इशारे असतात, त्यामुळं सतर्क राहावे लागतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
