
Udhav Thackeray Hambarda Morcha Gulmandi : मराठवाड्यात अतिवृष्टी आणि महापूराने मोठे नुकसान झाले. पण सरकारची भरपाईची रक्कम तुटपूंजी असल्याची ओरड सुरू आहे. त्याविरोधात आज छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेनेने हंबरडा मोर्चा काढला. गुलमंडी येथे उद्धव ठाकरे यांनी सभेला संबोधित करताना महायुती सरकारवर आसूड ओढला. त्यांच्या शाब्दिक चाबकाच्या फटकाऱ्यांनी सभेत जान आणली. त्यांनी सरकारला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी केली.
१५ दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. पाच एक जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेटलो होतो. तेव्हाच जाहीर केलं होतं की जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही, तोपर्यंत सरकारला सोडत नाही. गेल्यावेळी पाऊस होता. आता कडक ऊन आहे. आम्ही शहरी बाबू. लोकं विचारतात हे काय जाणार तिकडे. दोन गोष्टी केल्या. परंपरेप्रमाणे दसरा मेळावा घेतला. पाऊस पडत असताना चिखलात घेतला. आज तर कडक ऊन आहे. मेळाव्याच्या वेळी विचारलं लोकं चिखलात कसे बसणार. शेतकरी ऊन वारा पावसात अन्न धान्य पिकवतो. त्यांचं आयुष्य चिखलात असतं. आपण साधी सभा घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
संकटात शिवसेना तुमच्यासोबत
बोलणाऱ्यांना बोलू द्या. तुमच्या प्रत्येक संकटावेळी शिवसेना तुमच्यासोबत राहील. संकटाशी लढल्याशिवाय राहणार नाही. ५० हजार पर हेक्टर मागितले. हे काही मला स्वप्न पडलं नाही. शेतकऱ्यांना विचारून सांगितलं. मी म्हटलं तुमची कितीची अपेक्षा आहे. म्हणजे गाडा चालला पाहिजे. शेतकरी म्हणाले, ५० हजार पाहिजे. कर्जमुक्ती पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी मागणी केली.
50 खोके घेतले त्यांच्याकडे 50 हजार हेक्टरी मागतो
इथे पोस्टर लागले. त्यावर शेतकऱ्यांचा फोटो नाही. सरकार स्वतची पाठ खाजवून घेत नाही. लक्षात घ्या ५० हजार हेक्टरी आपण कुणाकडे मागत आहोत. ज्यांनी ५० खोके घेतले त्यांच्याकडे मागत आहोत. हे असे तसे वठणीवर येणार नाही. तुम्ही जो चाबूक दिला. तो चालवावा लागेल. त्यानंतर हे वठणीवर येतील, अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली.
मदतीची घोषणा ही सर्वात मोठी थाप
३१ हजार कोटीचं पॅकेज. इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज म्हणतात. हे सर्वात मोठं पॅकेज नाही. इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत कोणी ही थाप मारली नव्हती. इतिहासातील पहिली मोठी थाप फडणवीस सरकारने केली असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. कळवळा असता तर मोदी महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांच्या भाषणात दोन तीन भाषणे झाली. त्यात शेतकऱ्यांबद्दल उल्लेख नव्हता. ज्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत नाही. त्यांच्याकडे काय न्याय मागायचा. सत्तेत एक फूल आणि दोन हाफ बसले आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.