उद्धवजी संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला, त्यांची मुजोरी सहन करणार नाही : संभाजीराजे

उद्धवजी संजय राऊतांच्या जिभेला लगाम घाला, त्यांची मुजोरी सहन करणार नाही : संभाजीराजे
संभाजीराजे छत्रपती आणि संजय राऊत

छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत (Sambhajiraje Chhatrapati answer Sanjay Raut).

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 12, 2020 | 11:24 PM

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा प्रचंड चढला आहे. राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत (Sambhajiraje Chhatrapati answer Sanjay Raut). शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवरायांची तुलना मोदींशी करणं महाराजांच्या वंशजांना मान्य आहे का? असा सवाल केला. त्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला (Sambhajiraje Chhatrapati answer Sanjay Raut). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालावा, अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली. त्यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली.

संभाजीराजे म्हणाले, “उद्धवजी संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घाला. ते प्रत्येक वेळी छत्रपती घराण्यावर गरळ ओकून राजकारण करत आहेत. त्यांनी आधी माहिती घ्यायला पाहिजे होती, की मी जिजाऊ जयंतीमध्ये (सिंदखेड राजा) काय बोललो आहे ते. त्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही.”


विशेष म्हणजे आपल्या सभ्य वर्तन आणि संकेत पाळून बोलण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संभाजीराजेंचा संजय राऊत यांच्यावर टीका करताना संयम सुटल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराजेंनी आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांना लक्ष करताना थेट एकेरी उल्लेख केला. याबद्दल अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

संभाजीराजे यांच्या या ट्विटला संजय राऊत यांनी देखील उत्तर देत आपण छत्रपती घराण्याचा नेमका काय अपमान केला आहे? असा प्रश्न केला. ते म्हणाले, “माननीय छत्रपती संभाजीराजे आम्ही आपला नेहमीच आदर करतो. संजय राऊत यांनी असं कोणतं विधान केलं? ज्यामुळे छत्रपती घराण्याचा अवमान झाला? हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच चालत आहे. सदैव चालत राहिल. धन्यवाद आणि जय महाराष्ट्र.”


दरम्यान, या वादानंतर संभाजीराजेंनी वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली. तसेच पुस्तकावर बंदी न घातल्यास याचे वाईट परिणाम होतील, असा इशाराही दिला. संभाजीराजे म्हणाले, “दिल्लीच्या भाजप कार्यालयात ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. मात्र, त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होणार नाही. त्या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी. नाहीतर हा वाद वाढून याचे वाईट परिणाम होतील.”

संभाजीराजे यांनी सिंदखेड राजा येथील जिजाऊ जयंतीच्या कार्यक्रमात देखील यावर भाष्य करत आपली नाराजी व्यक्त केली होती. हाच धागा पकडून त्यांनी संजय राऊत यांना आधी माहिती घेण्यास सांगितलं.


संभाजीराजे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाह सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावं. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील.”

संबंधित बातम्या :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना ‘हे’ मान्य आहे का? संजय राऊतांचा उदयनराजे आणि संभाजीराजेंना सवाल

‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’, भाजपकडून पुस्तक प्रदर्शित, सोशल मीडियावर संताप


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें