संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत संदीप क्षीरसागर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले आता कधीच…
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेबाबत आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये, त्याचा शोध सुरू असून त्याला पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सुरुवातीपासूनच भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपी कृष्णा आंधळेबाबत बोलताना संदीप क्षीरसागर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. संदीप क्षीरसागर यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले संदीप क्षीरसागर?
संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे आता सापडेल असं मला वाटत नाही. त्या भागातील एक इतिहास आहे, जर तो सापडायचा असता तर पोलिसांना सापडला असता त्यामुळे मला वाटत नाही तो आता सापडेल असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी पहिल्यापासून या प्रकरणात सीडीआर तपासण्याची मागणी करत आहे. काही ना काही सीसीटीव्ही फुटेज मिळत आहे, आणि साखळी जुळत आहे. माध्यमांनी जे दाखवलं त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला ते पण पुढे येत आहेत. आणखी बरेच जण पुढे येणार आहेत.
आमदार सुरेश धस आणि मी यावर पोलीस अधीक्षकांना बोलणार आहोत, वाल्मीक कराडला अटक झाल्यानंतर देखील लोक रस्त्यावर आहेत याचा अर्थ लोकांमध्ये रोष आहे. प्रशासनाला मोकळा श्वास दिला पाहिजे, त्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, आणि सरकारने तो घेतला पाहिजे, अशी मागणीही यावेळी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. सरेंडर होण्यापासून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, हे केवळ मंत्रिपद असल्यामुळेच त्याला संरक्षण मिळाले, वाल्मीक कराडला पुण्यात कोणी रुग्णालयात दाखल केले? त्या काळात कोण त्याला भेटायला गेले याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
