हे चित्र काय बरोबर नाही? मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राऊतांचा संताप, फडणवीस, शिंदेंकडे केली मोठी मागणी
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे, मराठा बांधवांचं मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.

राज्यात पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा समाज मुंबईमध्ये एकवटला आहे. भर पावसात देखील आंदोलन सुरूच होतं. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे, हा विषय जर केंद्राच्या अखत्यारीमधला असेल तर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचं केंद्रात चांगलं वजन आहे. फडणवीसांचं वजन नरेंद्र मोदींकडे आहे, तर शिंदेंचं वजन हे अमित शाहांकडे आहे. या दोन्ही नेत्यांचं मन वळवण्याचं काम आणि एक वेगळा कायदा करण्याचं काम या दोन नेत्यांनी केलं पाहिजे, आम्ही पाहातोय, आमचा सगळा मराठी माणूस पावसात भिजतोय, चिखलात बसला आहे. महाराष्ट्रासाठी हे काय चित्र बर नाही, असं यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आरक्षणासाठी संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील, केवळ आश्वासन देऊन दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्यावर देखील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे जे समाजाचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत, ते फडणवीसांचे चेले आहेत. ते फडणवीस सांगतात तसेच वागत आहेत. आणि या विषयावर फडणवीसांनी आम्हाला संविधानाच्या गोष्टी सांगू नयेत. राजकीय इच्छा शक्तिचा एल्गार कोणी केला होता? संविधानाच्या चौकटीत आरक्षण बसालाय पाहिजे हे खरं आहे. संविधान बदलण्याचं काम सातत्यानं होत आहे, आताही संविधान बदललं. आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना अटक करण्यासाठी, तुम्ही संविधान बदलू शकता. आपले जे राजकीय विरोधक आहेत, मंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत त्यांनी पद सोडावं यासाठी तुम्ही बदल करू शकता. मग महाराष्ट्रातील मराठा समाज हा त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे. मग त्यासाठी तुम्ही संविधान बदलायला काय हरकत आहे? असा सवालही यावेळी राऊत यांनी केला आहे.
