भरत गोगावलेंचा मुलगा अद्याप फरार कसा? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले फडणवीसांचे सर्व मोहरे…

संजय राऊत यांनी महायुती सरकारवर गुंडांचे राज्य असल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर कडक शब्दांत टीका केली आहे; तसेच आमदार भरत गोगावले यांच्या मुलाच्या अटकेबाबतही सवाल उपस्थित केले आहेत.

भरत गोगावलेंचा मुलगा अद्याप फरार कसा? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले फडणवीसांचे सर्व मोहरे...
sanjay raut
| Updated on: Jan 04, 2026 | 12:01 PM

शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार, गृहखाते आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली आहे. राज्यामध्ये सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य सुरू असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरही बोचरी टीका केली. यावेळी संजया राऊतांनी निवडणूक आयोगाची तुलना थेट ताटाखालच्या मांजराशी केली. तसेच महाडमधील राडा प्रकरणात आमदार भरत गोगावलेंचा मुलगा अद्याप फरार कसा? असा सवालही संजय राऊतांनी केला.

जनता तुम्हाला ताटाखालचं मांजर म्हणूनच ओळखेल

संजय राऊतांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आजच्या निवडणूक आयोगाने आपली स्वायत्तता आणि प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीस मिळवली आहे. जर त्यांना खरोखरच लोकशाहीची जाण असेल, तर त्यांनी आपल्या कार्यालयात माजी निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांचा फोटो लावायला हवा. शेषन यांनी ज्या निस्पृहपणे काम केले, तसे काम करून दाखवावे. अन्यथा, जनता तुम्हाला ताटाखालचं मांजर म्हणूनच ओळखेल, असा आरोप संजय राऊतांनी केला.

आमदाराचा मुलगा दीड महिना बेपत्ता कसा?

रायगडमधील आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचा उल्लेख करत राऊत यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका केली. गोगावलेंच्या मुलावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन महिना-दीड महिना उलटला आहे. तरीही तो अद्याप फरार कसा? राज्यातील इतर सर्व गुन्हेगार पोलिसांना सापडतात, पण सत्ताधारी आमदाराचा मुलगा पोलिसांच्या हाताला लागत नाही, हे आश्चर्यकारक आहे. जर महाराष्ट्र पोलीस त्याला शोधू शकत नसतील, तर रायगडच्या जिल्हा पोलीस प्रमुखांना याचा जाब विचारला पाहिजे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

सरकारमध्ये गुंड आणि खुनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणाचा चेहरा-मोहरा बदलू असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या खालच्या थराला गेले आहे, हे फडणवीसांनी पाहावे. यांचे सर्व मोहरे हे भ्रष्ट आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सोलापूर उत्तरच्या उमेदवारीवरून किंवा तिथल्या घडामोडींवरून त्यांना जनतेला उत्तर द्यावे लागेल. हे सरकार गुंडांना पाठीशी घालणारे असून यांच्या सरकारमध्ये गुंड आणि खुनी आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.