किरीट सोमय्यांचे मुलाचे टेन्शन वाढले, शिवेसना ठाकरे गटाने टाकला मोठा डाव, तगड्या उमेदवारसोबत लढत होणार
मुलुंड वॉर्ड १०७ मध्ये नील सोमय्या यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने दिनेश जाधव यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका करत ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या मुलुंडच्या वॉर्ड क्रमांक १०७ मधून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने स्वतःचा उमेदवार न दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मुळात ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे होती. मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता. पण आता या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, ठाकरे गटाने नील सोमय्या यांच्या विरोधात एक पुरस्कृत उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे आता या प्रभागातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या बिनविरोध निवडीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाष्य केले. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असले तर भाजपचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांच्या सर्व भूमिका महाराष्ट्रविरोधी आहेत. त्यांनी शालेय शिक्षणात मराठी सक्तीलाही विरोध केला आहे. त्यासाठी ते उषा मेहतांसोबत कोर्टात गेले होते. महाराष्ट्रातील अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्यांनी अमित शाहांच्या सांगण्यावरुन मोहीम उघडली.त्यानंतर हे सर्व भ्रष्टचारी भाजपत गेल्यावर किरीट सोमय्यांचं तोंड शिवलं गेलं, अशी टीका संजय राऊतांनी केली.
मुलुंडचा १०७ वॉर्डाचा आग्रह राष्ट्रवादी शरद पवारांनी केला होता. आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे. आम्हाला ती लढणं गरजेचे आहे. आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. आपण सर्व मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजाने आम्ही त्यांना ती जागा दिली आणि त्यांनी एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. पण आम्ही ठरवलं होतं की राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहायचं. पण नेहमीप्रमाणे ज्यात बिनविरोध घोटाळा झाला, त्यात १०७ वॉर्डही त्यात सहभागी झाला, असा आरोप संजय राऊतांनी केला.
त्यानंतर मुलुंडचे ना** पोपटलाल बिनविरोध बिनविरोध असे नाचायला लागले. माझ्याविरोधात कोणी नाही असे नाचायला लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे कडवट शिवसैनिक दिनेश जाधव यांनी अर्ज भरला होता. त्यांना भीती होती. अजूनही त्यांचा अर्ज कायम आहे. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरेंनी एक पत्र दिलं आहे. या पत्रात दिनेश जाधव हे शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे १०७ मध्ये नील सोमय्या विरुद्ध दिनेश जाधव अशी लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलेले नाही. त्यांचे चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटे की होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाही. त्यांना संघर्ष करावा लागेल. सर्व महाराष्ट्र हा आपले राज्य मुंबईकर एक होतील आणि दिनेश जाधव विजयी होतील, याबद्दल आमच्या मनात शंका नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
इथे ५ कोटींची रक्कम
कल्याण डोंबिवलीत ज्या कोणी माघार घेतली ती नाट्यमय रित्या घेतलेली नाही. ज्या पद्धतीने ४० आमदार फुटले, त्याच पद्धतीने ही माघार घेतली. तिथे ५० कोटी होते आणि आता इथे ५ कोटी, जळगावला ५० लाख काही ठिकाणी १ खोक्यात उमेदवारी मागे घेतली गेली. पण खोकी आणि पेट्या यांच्या संदर्भ या माघारीशीची आहे. पण हे सर्व इतकं सोपं नाही. निवडणुका होणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
