तर वेश्या बऱ्या… महाराष्ट्राचा गोलपिठा बनला; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला

संजय राऊत यांनी ठाकरे गटातील फुटीनंतर भाजप आणि शिंदे गटावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. 'वेश्या बऱ्या' आणि 'महाराष्ट्राचा गोलपीठा' या शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. बाळासाहेब ठाकरे आणि आचार्य धर्माधिकारी यांच्या विधानांचा संदर्भ देत, राऊत यांनी भाजपवर राजकारण भ्रष्ट केल्याचा आरोप केला आहे.

तर वेश्या बऱ्या... महाराष्ट्राचा गोलपिठा बनला; संजय राऊतांचा घणाघाती हल्ला
संजय राऊत यांचे टीकास्त्र
| Updated on: Jun 18, 2026 | 11:06 AM

तृणमूल काँग्रेस पाठोपाठ महाराष्ट्रातील ठाकरे गटातही मोठी फूट पडली आहे. ठाकरेंचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे ठाकरे गटात संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर काल दोनदा मीडियाशी बोलताना संताप व्यक्त केला. यावेळी त्यांचा तोल गेला आणि त्यांनी शिव्याही घातल्या. तर खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी फुटीच्या मुद्द्यावरूनच हुज्जत घातली. त्यावरून ठाकरे गटाचा संताप किती पराकोटीला गेला हे समजून येतं. आजही संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी या पेक्षा वेश्या बऱ्या असं म्हटलं आहे. या ट्विटमधूनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

खासदार संजय राऊत यांचं ट्विट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यांनी आचार्य धर्माधिकारी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानांचा हवाला देत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या ट्विटमध्ये राऊत यांनी भाजपला टार्गेट केलं आहे. आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितले होते: पैशांचे राज्य हे वेश्येचे राज्य असते! बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते: सध्याच राजकारण पाहता वेश्या बऱ्या असे म्हणावेसे वाटते!त्या अधिक प्रामाणिक असतात असं सांगतानाच महाराष्ट्र अशा राज्याचा गोलपीठा बनवला आहे, इतिहास भाजपला कधीच माफ करणार नाही, असं संजय राऊत यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

हे भाजपचे दलाल

ट्विट केल्यावर दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेतूनही संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राचा गोलपीठा झाला हे तुम्हीही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलपीठा झाला, त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे. हे मान्य केलं पाहिजे. जे पेजेला जाईल त्याच्या शेजेला जातात, ही प्रवृत्ती वाढत आहे, म्हणूनच महाराष्ट्राचा गोलपीठा झाला आहे. शिंदे गटाचे हे दलाल आहेत. हे गोलपीठातील दलाल आहेत. हे दलाल निर्माण करण्याचं काम भाजपने केलं आहे. भाजपने देशाच्या संस्कृतीला काळीमा फासला आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी केला आहे.

दोन खासदारांनी खेळ बिघडवला

दरम्यान, ठाकरे गटातून सहा खासदार फुटणार असल्याची चर्चा होती. पण त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, दोन खासदारांनी पत्रावर सह्या केल्या नाहीत. त्यामुळे वेगळा गट स्थापन होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. ठाकरेंचे एकूण 9 खासदार आहे. नियमानुसार यातील सहा खासदार फुटले तरच वेगळा गट निर्माण होतो. पण सहा खासदारांपैकी दोन खासदारांनी ऐनवेळी कच खाल्ल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना मोठा शह देण्याचा प्रयत्न फसल्याचं स्पष्ट झालं आहे.

आज बैठक, व्हिप जारी

दरम्यान, ठाकरे गटाने आज संसदीय दलाची मिटिंग बोलावली आहे. मुख्य प्रतोद अनिल देसाई यांच्या सहींचा व्हीप खासदारांना बजावण्यात आला आहे. या बैठकीला खासदारांना बोलावलं आहे. त्यामुळे खासदार या बैठकीला उपस्थित राहतात की दांडी मारतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us