श्री संत तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान: देहूत भक्तांची अलोट गर्दी, वारीसाठी विशेष रेल्वे धावणार
देहूतून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा ३४० वा वार्षिक सोहळा भक्तीच्या मांदियाळीत साजरा झाला. पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा आणि अभिषेक सोहळे पार पडले. दुपारी पालखीचे प्रस्थान झाले आणि हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले. या वारीसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेगाड्यांची सोय केली आहे.

श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला आज देहूतून प्रारंभ होणार आहे. यंदाचा हा ३४० वा पालखी सोहळा असून, या निमित्ताने देहू नगरीत पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण आहे. आज पहाटे ४.३० वाजल्यापासूनच मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. शिळा मंदिरामध्ये अभिषेक झाल्यानंतर, स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक आणि संत तुकाराम महाराजांचे तृतीय चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक व पूजा करण्यात आली.
आज पहाटे ५.०० वाजता महापूजा संपन्न झाली. त्यानंतर सकाळी ७.०० वाजता नारायण महाराज यांच्या समाधीची विश्वस्तांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी ९.०० ते ११.०० वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १०.०० ते १२.०० वाजता यावेळेत काल्याचे कीर्तन पार पडणार आहे. तर दुपारी २.०० वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली. तसेच दुपारी ३.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५.०० वाजता पालखीची मंदिर प्रदक्षिणा होईल. तसेच सायंकाळी ६.०० वाजता पालखी इनामदार वाड्यात मुक्कामी पोहोचेल, जिथे रात्री ९.०० वाजता कीर्तन आणि जागर होईल. यानंतर आज देहूतून प्रस्थान झाल्यानंतर ही पालखी हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करेल, अशी माहिती समोर येत आहे.
वारकरी पंढरपूरच्या वारीसाठी सज्ज
आज देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान झाले असताना, उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली असून, लाखोंच्या संख्येने वारकरी इंद्रायणीच्या तीरावर एकवटले आहेत. ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा गजर करत हे वारकरी पंढरपूरच्या वारीसाठी सज्ज झाले आहेत. भावभक्तीने भारलेले हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला स्फूर्ती देत असून, वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांची परंपरा पुन्हा एकदा पंढरपूरच्या दिशेने मोठ्या उत्साहात मार्गस्थ होत आहे.
वारीसाठी तब्बल ८० पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या धावणार
दरम्यान वारीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांची सोय व्हावी म्हणून मध्य रेल्वेने तब्बल ८० पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. सोलापूर मध्य रेल्वे स्टेशनचे वाणिज्य विभागीय व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारकऱ्यांसाठी पंढरपूर स्टेशनवर ५ मदत केंद्रे, वॉटरप्रूफ मंडप आणि २४ तास विशेष रेल्वे अधिकारी उपलब्ध असतील. पुणे, नागपूर, अमरावती, कलबुर्गी, भुसावळ यांसारख्या प्रमुख रेल्वे स्थानकांवरून या विशेष गाड्या धावतील. यामध्ये पुणे-मिरज, नागपूर-मिरज, न्यू अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष, मिरज-कलबुर्गी आणि कोल्हापूर-कुर्डूवाडी या मार्गांचा समावेश आहे. कर्नाटक राज्यातून पंढरपूरला येणाऱ्या भाविकांसाठीही विशेष गाड्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
