Dhananjay Munde News : धनंजय मुंडेंचा राजीनामा; अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाने वाटली साखर
Ahilyanagar News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अहिल्यानगरमध्ये मराठा समाज बांधवांनी साखर वाटप केली. मुंडे यांची आमदारकी देखील काढून घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटत आहेत. अहिल्यानगरमध्ये धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात आला आहे. मराठा समाज बांधवांनी साखर वाटप करून हा आनंद व्यक्त केला.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्रात सादर केलेले फोटो आणि व्हिडिओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली. देशमुख यांच्या समर्थकांनी बीड बंदची देखील हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अहिल्यानगरमध्ये मराठा समाज बांधवांनी साखर वाटली आहे. यावेळी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी तसंच धनंजय मुंडे यांची आमदारकी देखील रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.