माझा हात रिकामी, काहीतरी काम द्या…; धनंजय मुंडेंची भर सभेत मागणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या जवळच्या कार्यकर्त्या वाल्मिक कराडची अटक झाली. यामुळे धनंजय मुंडे यांवर दबाव निर्माण झाला आणि त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट होती. या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. त्याला या हत्येप्रकरणात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर धनंजय मुंडे यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत, असं सांगत त्यांनी राजीनामा दिला होता. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची आस लागली आहे. त्यांनी स्वत: याबद्दल एक वक्तव्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचा रायगडमध्ये जाहीर सत्कार सोहळा पार पडला. या जाहीर सत्कार सोहळ्यात राज्याचे धनंजय मुंडे यांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय प्रवासात वडील नसताना सुनील तटकरे यांनी मला मोठा आधार दिला. राजकारणात माझे वडील नाहीत, पण त्यांच्या जागेवर मला सुनील तटकरे यांचा आधार मिळाला. त्यांनी अनेक वर्षांपासून देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध जपले आहेत. महाराष्ट्राच्या मातीत नेमकं काय चाललं आहे, याची त्यांना अचूक जाण आहे. त्यामुळेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.”
धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांना कोकणचा विकासपुरुष असे संबोधले. सुनील तटकरे यांना कोणतेही कागदपत्र लागत नाही. त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि प्रत्येक घडामोडीची पूर्ण माहिती आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. सुनील तटकरे यांचे वय माझ्यापेक्षा जास्त असले तरी ते उत्साहाने तरुणांनाही मागे टाकतील, असे धनंजय मुंडेंनी म्हटले.
माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या
आपल्या भाषणाच्या अखेरीस धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्याकडे एक भावनिक विनंती केली. “मी आज जे काही आहे, ते सुनील तटकरे यांच्यामुळेच आहे. माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, असे धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान या विधानामुळे रायगडच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनंजय मुंडे यांच्या या जाहीरपणे केलेल्या मागणीतून त्यांना मंत्रिमंडळात नवीन आणि मोठी जबाबदारी मिळेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
