पवार साहेबांबरोबर बैठक घ्यायचीय,थोडं समजून घ्यायचंय; खासदार उदयनराजे असं का म्हणाले? काय आहे कारण?
संपूर्ण देशात गौतम अदानी यांच्या चौकशीवरुन आरोप प्रत्यारोप सुरू असतांना शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या संदर्भात व्यक्त केलेल्या मतावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून उद्योजक गौतम अदानी यांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मतमतांतरे असल्याचे दिसून येत आहे. गौतम अदानी यांची जेपीसी चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे. प्रामुख्याने ही मागणी काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडून केली जात आहे. असे असताना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. गौतम अदानी यांची न्यायालयीन चौकशी व्हावी असं मत शरद पवार यांनी व्यक्त करत एक वेगळा सूर आवळला आहे. त्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये शरद पवारांनी एक प्रकारे गौतम आदमी यांना क्लीन चीट दिल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. त्यावरच खासदार उदयनराजे भोसले यांनीही भाष्य केले आहे.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, शरद पवार साहेब यांच्या बरोबर बैठक घ्यायची आहे. त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. अशी मिश्किल प्रतिक्रिया देत असतांना सर्व उद्योजकांनी टाटा ग्रुपचे अनुकरण करायला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांच्या विरोधात भाजपा विरोधक सगळे टीका करत असतांना आणि त्यांची चौकशीची मागणी करत असतांना शरद पवार यांनी वेगळं मत व्यक्त केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यावरच उदयनराजे यांनी मिश्किल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
टाटा ग्रुपने सर्वच क्षेत्रात उत्तम काम केले आहे. संपूर्ण जगत त्यांचे नाव निघते. त्यांचे अनुकरण सर्व उद्योजकांनी केले पाहिजे असंही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे. सामाजिक बांधिलकी असलेले उद्योजक म्हणून टाटांची ओळख आहे.
यांची ओळख आहे. जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, नंतर तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला हेच उद्योजकांचे चालू असते. टाटा ग्रुप यांनी वेगळं काम केले आहे. आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात काम केलं आहे. त्यांनी मोठं काम केले आहे. त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असेही उदयनराजे यांनी म्हंटलं आहे.
बाकीच्या उद्योजकांचे नाव आत्ता आले. टाटांचे नाव आधीपासून आहे. टाटांनी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोण डोळ्यासमोर ठेऊन काम केलं आहे. त्यांनी स्वतःचा विचार केला नाही. समाजाला पुढे घेऊन जाण्याचा विचार टाटांनी केला आहे. म्हणून या सर्व उद्योजकांनी तसं काम करावे असे उदयनराजे यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान गौतम अदानी यांच्या कंपनीत दोन हजार कोटी रुपये कुठून आले. त्यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे नाते काय आहे? असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर संपूर्ण देशात भाजप विरोधी पक्षांनी उद्योजक गौतम अदानी यांची चौकशी करण्याची मागणी केली होती.
त्यामध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी हल्लाबोल करत जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. हिंडनबर्ग प्रकरणात गौतम अदानी यांची चौकशी ही जेपीसी न होता ती न्यायालयीन व्हावी असे मत मांडले होते. त्यावरून शरद पवार यांच्यावर टीका होत होती.
शरद पवार आणि गौतम अदानी यांचा एक फोटोही नुकताच शेयर केला जात असून त्यावरून कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी शरद पवार यांचावर हल्लाबोल केला आहे. अशातच उदयनराजे यांनी मिश्किल पणे दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत आहे.
