Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाची तटकरे, भुजबळ, पटेलांना कल्पना होती, जयंत पाटील यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ; पडद्यामागील बैठकांचा सांगितला क्रम

Jayant Patil on Ajit Pawar : सुनेत्रा पवार आज संध्याकाळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वी राज्यात आणि राष्ट्रवादीत वेगवान घडामोडी घडत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या विलीनि‍करणावरून मोठे राजकीय नाट्य समोर येत आहे. नेमकं कोण काय लपवतंय याचा खुलासा जयंत पाटली यांनी केला आहे.

Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलिनिकरणाची तटकरे, भुजबळ, पटेलांना कल्पना होती, जयंत पाटील यांच्या नव्या गौप्यस्फोटाने खळबळ; पडद्यामागील बैठकांचा सांगितला क्रम
जयंत पाटील, अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 31, 2026 | 12:26 PM

Jayant Patil on NCP Merger: आज सकाळपासून राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादीत मोठ्या वेगवान घडामोडी घडत आहेत. सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याला याविषयीची काहीच माहिती नसल्याचा दावा करुन खळबळ उडवून दिली. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी विलिनिकरणाबाबत एकीकडे अजितदादादा गटाचे नेते कानावर हात ठेवत असतानाच शरद पवार यांच्या गटाचे नेते जयंतराव पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची घाई का करण्यात येत आहे, या सर्वसामान्यांच्या शंकेला दुजोरा मिळत आहे. राष्ट्रवादीतील एक गट अस्वस्थ असल्याचे सध्याच्या परिस्थितीवरून तरी समोर येत आहे.

अजितदादा NCP एकत्रि‍करणासाठी आग्रही

“दादांचं ज्या दिवशी अपघाती निधन झालं, तेव्हाच मी यावर भाष्य केलं होतं. अलिकडच्या काळात दादा बऱ्याच वेळा माझ्या घरी आले होते. अनेकवेळा त्यांची माझी चर्चा झाली. चार वेळा तर ते संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे. साहेबांच्या देखतच मला दोन्ही पक्ष मला एकत्र करायचे आहेत. माझ्याबद्दल जी जनमाणसात भावना आहे, ती सर्व पुसून मी पुन्हा साहेबांबरोबर साहेबांच्या पक्षात एकत्र यायला तयार आहे, असं ते म्हणायचे. एकदा नाही तर आठ दहा वेळा माझ्याकडे त्यांच्या बैठका झाल्या. बैठकीचं ठिकाण माझं घर होतं. पहिल्या दोन तीन बैठका तर माझ्याकडे त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच झाल्या. साहेबांबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. साहेबांसोबत जे झालं ते विसरू. दोन अडीच वर्षाचा कालखंड बाजूला ठेवून एक होऊ. राष्ट्रवादी एक करू ही त्यांची अंतिम आणि तीव्र आग्रह होता.” असा मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

१२ तारीख निश्चित

१६ तारखेला रात्री माझ्या घरी आमच्या पक्षाचे काही नेते आणि त्यांची बैठक झाली. हर्षवर्धन पाटील आणि अमोल कोल्हेंशीही त्यांची आधी बैठक झाली होती. १६ तारखेला आम्ही सर्व एकत्र होते. जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढवू असं ठरलं. आघाडीत लढल्यावर जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यावर ८ तारखेलाच एकत्र येणार होतो. मी म्हटलं दिल्लीत लग्नाला आहे. म्हटलं ८ आणि ९ ला नको. ते म्हणाले जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे. मग १० वरून १२ तारीख निश्चित केली, असा दुजोराही जयंत पाटील यांनी दिला. शरद पवार यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत हाच दावा केला होता.

दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटे उठून गमतीने म्हटलं दादा उद्या विमानाने शरद पवार यांना भेटायला जाऊ. ते म्हणाले, नाही नाही. ती धावपट्टी लहान आहे. माझं विमान तिथे उतरणार नाही. मग आम्ही दुसऱ्या दिवशी गाडीने निघालो. तिथे सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर १२ तारीख निश्चित केली. साधारणपणे ८ आणि ९ तारखेपर्यंत जिल्हा परिषद होईल. आणि १२ तारखेला निर्णय घेऊ, असं त्या बैठकीत ठरलं, असे जयंत पाटील म्हणाले.

पटेल, तटकरे, भुजबळांसह इतरांना माहिती

आधी दोन्ही पक्ष एकत्र करायचे. त्याबद्दल अजितदादांचा आग्रह होता. मी मोकळ्यावेळी अधिक तपशीलांचा खुलासा करेन. अनेक वेळा त्यांची चर्चा झाली. सुप्रिया सुळेही काही वेळा बैठकीला होत्या. बऱ्यापैकी चर्चा पुढे गेली होती. त्यांनी हेही सांगितलं होतं की, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ आणि अन्य आमदारांना कल्पना दिल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अजितदादांचं मत असं होतं की, मी निर्णय घेतो, तेव्हा तो अंमलात येतो. त्यामुळे त्याबाबत चिंता करू नका. माझे सहकारी मी म्हणेल तो निर्णय घेतील, असा मोठा खुलासा जयंत पाटील यांनी केला.

सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यंत्री होणं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्यावर त्याचे सोपस्कार पार पडतात. त्यांच्या पक्षाच्या निर्णयावर मी बोलणार नाही. आज तरी त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. त्यांचे निर्णय पटेल आणि तटकरे घेत आहेत. काहीप्रमाणात भुजबळही घेत आहे. तिघांच्या निर्णयाची अंमलबजावणी होत असेल. त्यावर मी बोलणं योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.