दुचाकीवरुन घरी चालले होते दोघे तरुण, पण वाटेतच काळाने घाला घातला !

| Updated on: Mar 23, 2023 | 6:10 PM

वेळे येथून काम आटोपून वाईला घरी जात असताना तरुणावर काळाने घाला घातला. घरी जाण्यासाठी निघालेले तरुण घरापर्यंत पोहचलेच नाहीत.

दुचाकीवरुन घरी चालले होते दोघे तरुण, पण वाटेतच काळाने घाला घातला !
दुचाकी अपघातात दोघे तरुण ठार
Image Credit source: TV9
Follow us on

सातारा / संतोष नलावडे : वाई तालुक्यातील वेळे गावच्या हद्दीत गुळूंब रस्त्यावर पुलाच्या भिंतीवर दुचाकी आदळून दोन जण जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद गंगाराम यादव आणि प्रथमेश खैरे अशी मयत तरुणांची नावे असून दोघेही वाई येथील रहिवासी आहेत. अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले आहे. मयत प्रथमेश खैरे हा वाई येथील चैतन्य अर्बन बँकेतील अधिकारी संतोष खैरे यांचा मुलगा आहे. याप्रकरणी प्रमोद याचे वडिल गंगाराम यादव यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भुईंज पोलीस पुढील तपास करत आहेत.

बाह्यवळण न दिसल्याने अपघात

पुणे बंगळूर महामार्गालगत वेळे ते गुळुंब रस्त्यावर स्मशानभुमीजवळील ओढ्यावर नविंग पुलाचे काम सुरू आहे. गुळूंब बाजूकडे भरधाव वेगात दुचाकीवरून प्रमोद आणि प्रशमेश हे दोघे वेळे गावाकडे जात होते. या रस्त्यावर ओढ्यावरील पुलाचे काम सुरु असल्याने या ठिकाणी पत्रा लावून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. पत्र्याच्या कडेचे बाह्यवळण न दिसल्याने दुचाकी पुलाच्या भिंतीवर जोरदार आदळली.

एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू

यात दुचाकीवरील प्रमोद यादव आणि त्याच्या पाठीमागे बसलेला प्रथमेश खैरे हे दोघे दुचाकीसह पाण्यात पडले. यात प्रमोद गंगाराम यादव याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रथमेश खैरे याला उपचारासाठी सातारा येथे घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात मोटार सायकलचे पूर्ण नुकसान झाले आहे. या रस्त्यावर पुलाचे काम सुरू असतानाही ठेकेदाराने योग्य ती काळजी न घेतल्यामुळे या रस्त्यावर अपघात होत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

हे सुद्धा वाचा