भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्याचा वकिलांचा मोठा दावा, अटकपूर्व जामिनासाठी यामुळे अर्ज
Satish Bhosle: गुन्हा कितीही मोठा असला तरी आरोपीला अटकपूर्व जामीन मागायचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही जामीन मागितला आहे. उद्याच्या तारखेनंतर न्यायालयात एक दोन तारखा पडू शकतात आणि त्यानंतर फायनल सुनावणी होईल.

Satish Bhosle: भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर बीड जिल्ह्यातील शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र खोक्या चार दिवसांपासून फरार आहे. आता त्याचे वकील शशिकांत सावंत यांनी मोठा दावा केला आहे. दुसरीकडे सतीश भोसले हा पोलिसांना शरण येणार असल्याची चर्चा सुरु आहे.
शशिकांत सावंत काय म्हणाले…
अॅड. शशिकांत सावंत म्हणाले, सतीष भोसले उर्फ खोक्या याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या बीड जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांमध्ये सतीश भोसले एक नंबरचा आरोपी नाही. घटना घडल्यापासून सोळा दिवसांनी ढाकणे कुटुंबियांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी सतीश भोसले हा घटनास्थळी नव्हता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. या सगळ्या बाबीवरून आम्ही बीड सत्र न्यायालयामध्ये मांडल्या आहेत. तसेच सतीष भोसले याला अटकपूर्व जामीन मिळावा, म्हणून अर्ज दाखल केला आहे, त्याची सुनावणी उद्या होणार आहे.
अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणे हा अधिकार
गुन्हा कितीही मोठा असला तरी आरोपीला अटकपूर्व जामीन मागायचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही जामीन मागितला आहे. उद्याच्या तारखेनंतर न्यायालयात एक दोन तारखा पडू शकतात आणि त्यानंतर फायनल सुनावणी होईल त्या नंतर न्यायालय निकाल येईल.
काय आहे प्रकरण
बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला सतीश भोसले याने अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले याचे पैशांचे बंडल फेकणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली. त्यावेळी त्याच्या घरात हत्यारे, शिकारीसाठी लागणारे जाळे आणि इतर साहित्य मिळाले होते. सतीश भोसले हा राजकारणात सक्रिय आहे. त्याच्याकडे भाजपचे महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पदही होते. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याने त्याचा परिसरात दबदबा आहे.
