माझा नवरा आणि आमचा परिवार… सतीश ऊर्फ खोक्या भोसलेच्या बायकोचं उपोषण सुरू; पाच मागण्या कोणत्या?
सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले यांच्या अटकेनंतर त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात आले आणि नंतर आगीलाही लावण्यात आले. त्यांची पत्नी तेजू भोसले बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहेत.

भाजप पदाधिकारी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसलेच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. सध्या सतीश ऊर्फ खोक्या भोसले हा तुरुंगात आहे. शिरूरमधील ढाकणे कुटुंबाला झालेल्या मारहाणीनंतर तो फरार होता. याप्रकरणानंतर सतीश भोसलेच्या शिरूर कासार गावातील घरावर बुलडोझर फिरवण्यात आला आहे. वन विभागाच्या जागेवर त्याने अनधिकृतपणे घर बांधले होते. त्यामुळे वनविभागाने कारवाई केली. या कारवाईनंतर रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी त्याच्या घराला आग लावली. आता याप्रकरणी सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या पत्नीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
सतीश उर्फ खोक्या भोसलेची पत्नी तेजू भोसले ही बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसली आहे. तिने तिच्या विविध मागण्या सरकारसमोर मांडल्या आहेत. या मागण्यांसाठी तेजू भोसले ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करत आहे.
सतीश भोसलेच्या पत्नीच्या मागण्या काय?
1)आमचं घर पाडणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा.
2)आमची आठ घर वनविभागाने उध्वस्त केलीत आम्हाला त्याच गावात शासनाने जागा उपलब्ध करून पक्के घर बांधून द्यावे.
3)ढाकणे परिवाराला झालेल्या मारहाणीत सतीश भोसले त्याचे तीन भाऊ व वडील यांचा काही संबंध नाही, तरीसुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल केले त्यांना निर्दोष मुक्त करावे.
4)बाल लैंगिक अत्याचार विनयभंग, मारहाण अंतर्गत जे गुन्हे दाखल आहेत त्यातील फरार आरोपींना तात्काळ अटक करा.
5)माझा नवरा आमचा परिवार व पारधी समाज यांच्या विरोधात खोटा अपप्रचार सुरू आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा.
…तोपर्यंत उपोषण सुरू राहणार
“आमचं घर वनखात्याने उद्ध्वस्त करून टाकल आहे. आमचं पुनर्वसन करण्यात यावं. आम्हाला घरदार नाही आमचे लेकर उन्हात बसत आहेत. आमचे मालक अटक झाले पुढचे आरोपी अटक झाले पाहिजे. आमचं घर दार जाळून टाकलं आमच्या महिलांना मारहाण केली. गावगुंडे कोणते आहेत त्यांना शोधून घेतला पाहिजे. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया सतीश भोसले यांच्या पत्नी तेजू भोसले यांनी केली.
जोपर्यंत पुढच्या आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही बसणार
तसेच सतीश भोसलेची भावजय संगीता भोसले हिनेही याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. “आमचे घरदार जाळून टाकले आहे. आमचे घर उध्वस्त केले. रोडला बसण्यापेक्षा आम्ही इथे बसलो आहोत. जोपर्यंत पुढच्या आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत आम्ही बसणार आहोत. आमची जागा आमचं घर भेटावं, कोणी बघणे, आमचा सगळा पसारा भरून याला घरात काही राहिल नाही”, असे संगीता भोसले म्हणाल्या.
“हरणाची शिकार वैगरे ते खोटं आहे. लोक असं म्हणतात की ते कत्तलखाना आहे, कत्तलखाना असता तर कॅमेरे असते का? वनविभागाने वाल्यांनी सगळा पसारा बाहेर काढा. कत्तलखान्यात एवढा पसारा असतो का? तो कत्तलखाना नाही. राहण्याचं घर आहे. शंभर वर्षापासून आम्ही तिथे राहतोय. जे जाळे आहेत ते वैदू लोकांकडून आणून, सतीशच्या घरासमोर टाकले आहेत. जे मास आहे ते सुद्धा वैदूच्या येथून आणून घरासमोर टाकल आहे. जे सांगतात कातडे आहेत मास आहेत ते अजिबात सतीशच्या घरातले नाहीत”, असेही संगीता भोसलेंनी म्हटले.
