काय झाडी, काय डोंगर, एकनाथ शिंदे एकदम ओक्के… शहाजी बापू पाटील पुन्हा फॉर्मात
Shahajibapu Patil: देशातील बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतींचा थरार सांगलीच्या बोरगाव मध्ये पार पडत आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपला प्रसिद्ध डायलॉग मारला.

देशातील बैलगाडी शर्यतीच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या बैलगाडी शर्यतींचा थरार सांगलीच्या बोरगाव मध्ये पार पडत आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांकडून देशातल्या सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतींचा आयोजन करण्यात आलं आहे. हजारो बैलगाड्या बोरगाव येथील कोड्याच्या माळराणावर धावत आहेत. सोबतच शिवसेना बैलगाडा शर्यतीचे अधिवेशन देखील याच ठिकाणी भरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही उपस्थित होते.
काय झाडी, काय डोंगर…
शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केलेल्या भाषणात काय झाडी, काय डोंगर हा डायलॉग मारला. आपल्या भाषणात शहाजीबापू पाटील म्हणाले की, साहेब तुम्हाला कळकळीची विनंती करतो. ज्या उद्धव ठाकरे आणि संजय राऊताने या भोळ्या भाबड्या चंद्रहार दादाला फसवलं, चंद्रहार दादाचा विश्वास घात केला. त्यांनी उभा केलं चंद्रावर दादाला आणि निवडून आणलं विशाल पाटलाला.’
पुढे बोलताना बापूंनी म्हटले की, ही गद्दार माणसं आहेत साहेब, याचा बदला आता तुम्हीच घ्या आणि चंद्रहार दादाला राज्यसभेवर दिल्लीला वाजत गाजत घेऊन जाऊया. माझ्या रक्ताची शपथ आहे, दुसरीकडे मत टाकायचं नाही. यावेळी बापूंनी पुन्हा एकदा काय झाडी काय डोंगर सगळं एकनाथ शिंदे एकदम ओके असा डायलॉग म्हणून दाखवला.
बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाचे कौतुक
या कार्यक्रमातील आपल्या भाषणात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आज येते धुरळा उडाला आहे. रेकॉर्ड ब्रेक बैलगाडी शर्यत या ठिकाणी भरवली आहे. जनसागर उसळला आहे.एखाद्या फिल्मस्टारला जेवढी गर्दी होत नाही. तेवढी गर्दी माझ्या या लाडक्या बैलांना पाहण्यासाठी येथे झाले आहे. ज्या बैलाने भाग घेतला आहे, ते आपले सेलिब्रिटी आहेत. बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बॉन्सर सुद्धा ठेवले आहेत. क्या बात है गोवंशाची ताकद काय आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
चंद्रहार पाटलांची थोपटली पाठ
आमच्या पैलवान गड्याचा नाद नाही करायचा. नाद केला तर एकच फाइट वातावरण टाइट. शहाजी बापूंच्या डायलॉगने आसामचं पर्यटन वाढलं. पण ते आता महाराष्ट्राचं वाढवा. शहाजी बापूंना ब्रँड अँबेसिडर करा.लाडक्या बळीराजाचा आधार तो आमचा चंद्रहार पाटील. पैलवानांच्या गळ्यातला माणिक मोत्याचा हार म्हणजे चंद्रहार, शेतकऱ्यांचा लाडका चंद्रहार. चंद्राहार पैलवान जरी असला तरी तो उसासारखा गोड आहे. काश्मीर मध्ये रक्तदान शिबिर घेतले. ते भाषण बाजी नाही करत डायरेक्ट ऍक्शन घेतात. गोवंशाच रक्षण करण्यासाठी चंद्रहार आखाड्यात उतरला आहे. चंद्रहार ‘तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’.
