ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचं बटण दाबलं ते स्वर्गात जाणार; दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे, शहाजीबापू पाटलांची तुफान फटकेबाजी

ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचे बटण दाबले ते स्वर्गात जाणार असा अजब दावा सांगोल्यातील विजयी सभेत शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी केला आहे, त्यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे.

ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचं बटण दाबलं ते स्वर्गात जाणार; दीपक साळुंखे पांढऱ्या पायाचे, शहाजीबापू पाटलांची तुफान फटकेबाजी
शहाजीबापू पाटील
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 29, 2025 | 7:20 PM

ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचे बटण दाबले ते स्वर्गात जाणार असा अजब दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. ते सांगोल्यातील विजयी सभेत बोलत होते.  सांगोल्याच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठं यश मिळालं. शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील यांनी तुफान टोलेबाजी केली.  यावेळी बोतलाना त्यांनी माजी आमदार दीपक साळुंके यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. दीपक साळुंखे हे पांढऱ्या पायाचे आहेत, असं यावेळी शहाजीबापू  पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शहाजीबापू पाटील? 

ज्यांनी ज्यांनी धनुष्य बाणाचे बटण दाबले ते स्वर्गात जाणार असा अजब दावा त्यांनी यावेळी बोलताना केला आहे, त्यांच्या या विधानानंतर चर्चेला उधाण आलं आहे, दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  माजी आमदार दीपक साळुंखे म्हणतात मी किंग मेकर आहे, मी जिकडे तिकडे विजय असा त्यांचा दावा होता. पण ते पांढऱ्या पायाचे आहेत. ते गणपत आबांकडे गेले त्यांचा पराभव झाला, विजयसिंह मोहितेंकडे गेले त्यांचा पराभव झाला, लोकसभेला संजय शिंदेंकडे गेले त्यांचा पराभव झाला, पुन्हा निंबाळकरांकडे गेले त्यांचा पराभव झाला. आता भाजपकडे गेले भाजपचा पराभव झाला, असा जोरदार हल्लाबोल या कार्यक्रमात शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  चाळीस वर्षे मी एकट्याने लढत होतो, माझी एकट्याने लढत होती. गणपतराव देशमुख यांच्यासोबतही लढत होती.  हत्तीबरोबर लढाई केलेला मी माणूस आहे. आणि हे माझे पाय ओढत आहेत. मी शून्य नाही. अजून भाजपात प्रवेश नाही , तरच  इतकी मस्ती कशी आली? पालकमंत्री कार्यालयात येऊन चहा पिऊन गेले तर इतकी मस्ती? अशा शब्दात शहाजीबापू पाटील यांनी दीपक साळुंखे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान शहाजीबापू पाटील यांच्या या टीकेला आता साळुंखे काय उत्तर देणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.