Sharad Pawar : दिल्लीत उद्धव ठाकरे 6 व्या रांगेत बसण्यावरुन राजकारण, त्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?
Sharad Pawar : "राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप संशय घेण्यासारखे. राहुल गांधींकडून एफिडेविट मागणं योग्य नाही. आयोगावर लावलेल्या आरोपांची सखोल चौकशी झाली पाहिजे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर आक्षेप नोंदवलाय. राहुल गांधींच्या प्रश्नांना आयोगाकडून उत्तर हवं, भाजपकडून नको" असं शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याची सध्या चर्चा सुरु आहे. खासकरुन त्यांच्या आसनव्यवस्थेवरुन सत्ताधारी त्यांना लक्ष्य करत आहेत. गुरुवारी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनर कार्यक्रमाच आयोजन केलं होतं. यासाठी उद्धव ठाकरे संपूर्ण कुटुंबासह तिथे हजर होते. राहुल गांधी यांनी यावेळी मत चोरीचा मुद्दा उपस्थित करत प्रेझेंटेशन केलं. यावेळी उद्धव ठाकरे सहाव्या रांगेत बसले होते. त्यांच्याशेजारी मुलगा आदित्य ठाकरे आणि संजय राऊत होते. हाच फोटो व्हायरल झाला असून त्यावरुन भाजप, शिवसेनेची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरु आहे. कुठे गेला ठाकरे ब्रांड? असा प्रश्न सत्ताधारी विचारत आहेत.
आज शरद पवार यांची नागपूरमध्ये पत्रकार परिषद झाली. त्यांनी उद्धव ठाकरे यांचा बचाव केला. “काल दिल्लीत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्याला मी हजर होतो. मी कालपासून बघतोय, उद्धव ठाकरे कुठे बसले? यावर चर्चा सुरु आहे. पावर पॉइंट प्रेझेंटेशन होतं” असं शरद पवार म्हणाले. “ज्यावेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हटल्यावर सिनेमा बघताना ज्या प्रमाणे आपण पहिल्या रांगेत बसत नाही, आपण पाठीमागे बसतो त्याच पद्धतीने मी स्वत: आणि फारुख अब्दुल्लाह शेवटी बसलेलो. आमच्याजवळ उद्धव ठाकरे होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री होते” असं शरद पवार म्हणाले.
उद्धव ठकरे कुठे बसले? हा कारण नसताना, चर्चेचा विषय
“साधारणत: मी सांगायची आवश्यकता नाही, प्रत्यक्ष स्क्रिनजवळ कोणी बसत नाही. दुर्देवाने उद्धव ठकरे कुठे बसले? हा कारण नसताना, चर्चेचा विषय केला गेला. प्रेस कॉन्फरन्स अतिशय कष्ट करुन, सखोल अभ्यास करुन मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले” असं शरद पवार म्हणाले.
BMC निवडणुकीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले तर मविआ राहणार नाही अशी चर्चा
“नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका याच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही. त्यामुळे एखाद्या पक्षाने मत मांडली असतील तर आज मी त्यावर भाष्य करु शकत नाही. आम्ही बसून चर्चा करुन, एकवाक्यता करता येईल का? हा प्रयत्न करणार आहोत” असं उत्तर शरद पवार यांनी दिलं.
