तिहार जेलमध्ये छोटा राजनने तोंड उघडण्याची पवारांना भीती: आंबेडकर

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आव्हान स्वीकारणार का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर प्रकाश आंबेडकरांनी नवा दावा केला आहे. तिहार तुरुंगात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल तोंड उघडेल, अशी भीती शरद पवारांना आहे, असा …

, तिहार जेलमध्ये छोटा राजनने तोंड उघडण्याची पवारांना भीती: आंबेडकर

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आव्हान स्वीकारणार का असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. इतकंच नाही तर प्रकाश आंबेडकरांनी नवा दावा केला आहे. तिहार तुरुंगात बंदिस्त असलेला कुख्यात डॉन छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चन मिशेल तोंड उघडेल, अशी भीती शरद पवारांना आहे, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी गोंदिया येथील प्रचारसभेत तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या दोघांनी तोंड उघडले, तर अनेकांचे खरे चेहरे समोर येतील असा गर्भित इशारा दिला होता. त्यांचा रोख राष्ट्रवादीकडे होता. त्यानंतर गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानाबाद येथील प्रचारसभेत, आमची कळ काढाल तर माफी नाही, असे प्रत्त्युत्तर दिले होते.

राष्ट्रीय पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी परस्परांना आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचे आव्हान खरोखरच स्वीकारतील का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी केला.

निवडणूक काळात सगळ्यांच्या सगळ्या गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, सर्वच गोष्टी समोर आल्या पाहिजेत, म्हणून पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे आव्हान स्वीकारणे गरजेचे आहे, आहे अशी पुष्टीही यावेळी त्यांनी जोडली.

प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

सध्या तिहार तुरुंगात कुख्यात डॉन छोटा राजन आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्यातील आरोपी बंदिस्त आहेत. या दोघांनी तोंड उघडले तर अनेकांचे खरे चेहरे समोर येतील, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी गोंदिया येथील सभेत दिला. भारतातून फरार असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने शरणागतीचा प्रस्ताव भारत सरकारला दिला होता. त्यावेळी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार होते. परंतु, हा प्रस्ताव शरद पवार यांनी फेटाळला होता, याचा संदर्भ देताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, की ही बाब दाऊदचा एकेकाळचा हस्तक असलेला आणि सध्या तिहार तुरुंगात कैद असलेल्या छोटा राजनच्या तोंडून बाहेर पडेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. तसेच ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील आरोपीही तिहार जेलमध्ये कैद आहे. त्यानेही तोंड उघडले, तर काय होईल, याचाही धसका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला आहे. म्हणूनच उस्मानाबाद येथील प्रचार सभेत शरद पवारांनी मोदींना प्रत्त्युतर देताना, आमची कळ काढाल तर माफी नाही, असा अप्रत्यक्ष इशाराच मोदींना दिला होता. असे हे ब्लॅकमेलिंगचे राजकारण सुरु असताना, सर्व सत्य समोर येणे गरजेचे आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचे आव्हान स्वीकारून तिहारमधील बाबींचा खुलासा करावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *