मोठी बातमी, शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला
उत्तम जानकर यांच्याकडून सातत्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Uttam Jankar Meet DCM Ajit Pawar : राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे विधानसभा निवडणुकीपासून सातत्याने चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निकालानतंर उत्तम जानकर यांनी अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरुन त्यांनी आंदोलनाचा इशारा देत आमदारकी सोडण्याची तयारीही दर्शवली होती. उत्तम जानकर यांच्याकडून सातत्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता उत्तम जानकर हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मतदारसंघातील काही कामांसाठी अजित पवारांची भेट
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी आज सकाळी ११ च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मुंबईतील मंत्रालयात उत्तम जानकर आणि अजित पवारांची भेट झाली. यावेळी त्या दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. उत्तम जानकर यांनी मतदारसंघातील काही कामांसाठी अजित पवारांची भेट घेत असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उत्तम जानकर आणि शरद पवार यांच्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आले आहे. उत्तम जानकर यांनी अचानक अजित पवारांची भेट का घेतली, या भेटीमागे काही राजकीय हेतू आहे का, अशी चर्चा रंगली आहे. उत्तम जानकर हे काही मोठा निर्णय घेणार का याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.