शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा NDA शी घरोबा? खासदारांची पंतप्रधान मोदींशी भेट… त्या 15 मिनिटात काय घडलं?

NCP-NDA Meets: सत्ताधारी लोकशाही आघाडीशी शरद पवार यांची राष्ट्रवादी घरोबा करणार असल्याच्या चर्चेदरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात 8 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. 15 मिनिटांच्या या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली? ही सर्वच माहिती आता समोर आली आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा NDA शी घरोबा? खासदारांची पंतप्रधान मोदींशी भेट... त्या 15 मिनिटात काय घडलं?
शरद पवार राष्ट्रवादी, नरेंद्र मोदी
| Updated on: Aug 11, 2026 | 9:47 AM

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर केंद्र सरकारला एक मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका दाव्यानुसार, शरद पवार राष्ट्रवादी या विधेयकावर सरकारला पाठिंबा देऊ शकते. तर सोमवारी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात 8 खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. अर्थात या भेटीची माहिती सुप्रिया सुळे यांनी अगोदरच दिली होती. 15 मिनिटे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत ही बैठक चालली. काय झाली या दरम्यान चर्चा? राष्ट्रवादी खरंच सत्ताधाऱ्यांसोबत घरोबा करणार का? आता याविषयीची सर्वच माहिती समोर आली आहे.

संसदेत कामकाज ठप्प, म्हणून पंतप्रधानांची भेट

खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली. संसदेतील कामकाज सुरळीत पार पडत नाही. त्यामुळे जनतेच्या आणि मतदार संघातील प्रलंबित कामांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीमागची कारणं त्यांनी विषद केली. खासदारांच्या मतदारसंघातील काही कामं प्रलंबित आहेत, त्याची माहिती मोदींना देण्यात आली. यापूर्वी CJP आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती.

खासदारांनी मांडले हे प्रश्न

थोर समाज सुधारक महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

मराठवाड्यासाठी मदत निधी आणि दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी पॅकेजटी घोषणा करावी. उजनी धरणातून मांजरात पाणी सोडावे. पीक विमा योजनेत सुधारणा करावी. कांद्याच्या किंमतीचा मुद्दा बैठकीत ऐरणीवर होता.

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्प, पुणे-नाशिक मेट्रो, छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएम गती शक्ती योजना राबवावी आणि कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे. याशिवाय जेएपीटीचा मुद्दा मांडण्यात आला.

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लवकर प्रस्ताव पाठवण्याची मागणी करण्यात आली.

गंभीर आजारावर उपचारासाठी पीएम केयर्स फंडअतंर्गत खासदारांच्या निधीत वाढ करावी. कॅन्सर उपचारांसाठी मोठी तरतूद करावी आणि चंद्रभागा नदीच्या प्रदुषणाचा मुद्दा ऐरणीवर आणण्यात आला.

शरद पवार राष्ट्रवादी NDA मध्ये सहभागी होणार?

शरद पवार राष्ट्रवादी एनडीएमध्ये सहभागी होणार का? याविषयीच्या चर्चा खासदार बजरंग सोनवणे यांनी सपशेल फेटाळल्या. आम्ही विरोधी पक्षात आहोत आणि तिथेच राहू. सत्ताधारी पक्षांसोबत बैठक घेणे अथवा त्यांच्या नेत्यांशी चर्चा करणे म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत, असे होत नाही, असे सोनवणे म्हणाले. प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी झटावे लागते. सध्या संसदेत कोंडी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या समस्या, अडचणी सोडवण्यासाठी अशा भेटीतून मार्ग निघतो असे ते म्हणाले. तर डॉ. अमोल कोल्हे यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून महाराष्ट्राच्या विकासासंबंधी मोदींशी चर्चा झाल्याचे सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us