एकनाथ शिंदे ते नीलम गोऱ्हे व्हाया संजय राऊत; शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील 5 मुद्दे
दिल्लीत झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावरून निर्माण झालेल्या वादावर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिल्या. नीलम गोऱ्हे यांच्या भाष्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. राजधानी नवी दिल्लीत गेले तीन दिवस हे संमेलन सुरु आहे. या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या अनेक मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या संमेलनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. मराठी साहित्य संमेलनावरुन सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर होत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. आता या आरोपांसह विविध चर्चेत असलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले.
शरद पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. शरद पवारांनी या सर्व प्रश्नांवर सविस्तर उत्तर दिली. शरद पवारांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या पत्रकार परिषदेतील 5 महत्त्वाच्या मुद्दे जाणून घेऊया.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
💠नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती हे माझं मत होतं. हे अधिवेशन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या. त्यांनी कोणत्या गाडीचा उल्लेख केला. मला वाटतं की राज्याच्या विधीमंडळात येऊन त्यांना चार टर्म झाले असतील. या चार टर्म कशा मिळाल्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा सहभाग त्याची चर्चा न केलेली बरी, असे शरद पवार म्हणाले.
💠नीलम गोऱ्हे यांची विधीमंडळात एन्ट्री झाली किंवा महाराष्ट्रात झाली तो प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातून झाली. नंतर त्यांचा काळ राष्ट्रवादीत गेला. नंतर कदाचित त्या काँग्रेसमध्ये होत्या. नंतर त्यांचा कालवधी शिवसेनेते गेला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेला. हल्ली त्या शिंदेंच्या संघटनेत काम करत आहे. मर्यादित काळात त्या दोन चार पक्षाचा अनुभव घेतला आहे. सातत्य होतं की नाही हे माहीत नाही. हा स्वतचा अनुभव लक्षात घेता, त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं, असे शरद पवारांनी म्हटले.
💠संजय राऊत म्हणतात ते योग्य आहे. निश्चित संमेलनाचे जे आयोजक आहेत, त्याबद्दलची नापसंती त्यांनी जाहीर व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यावर पडदा टाकायला हरकत नाही. साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. मी स्वागत अध्यक्ष होतो. म्हणून त्यांना माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तर माझी काही तक्रार नाही, असे शरद पवार म्हणाले.
💠मी कुणाचा सत्कार करायचा आणि करायचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल तर मी लक्षात ठेवेन, असाही मुद्दा शरद पवारांनी मांडला.
💠मी मस्साजोगला जाऊन आलो. मस्साजोगकरांच्या तीव्र भावना पाहिल्या. स्वाभिमानी लोक पदावर राहणार नाही. एवढा हल्ला होतोय तर एखादी व्यक्ती बाजूला झाली असती, असेही शरद पवार म्हणाले.
💠अजित पवारांकडे माहिती जास्त असेल. माझ्याकडे नाही. काही लोकांवर असे आरोप झाले त्यांना सत्ता सोडावी लागली आणि चौकशी झाली. नैतिकता आणि या लोकांचा संबंध आहे हे मला जाणवत नाही. त्यामुळे त्यावर काही भाष्य करण्याची गरज नाही, असेही शरद पवारांनी म्हटले.
