Sharad Pawar : काय करावं हे त्यांनी ठरवलेलं…सुनेत्रा पवारांच्या शपथविधीआधी शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar : अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचं निधन हा फक्त राष्ट्रवादी, पवार कुटुंबियच नाही तर महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात आहे.

“अजित पवार हा काम करणारा एक कर्तुत्ववान नेता होता. त्याचं वैशिष्ट्य हे होतं की, लोकांच्या प्रश्नावर सखोल माहित घ्यायची आणि लोकांना न्याय द्यायचा” अशा शब्दात शरद पवारांनी अजित पवार यांच्या आठवणी जागवल्या. आज अजित पवार आपल्यात नाहीत. बुधवारी बारामती विमानतळाजवळ भीषण विमान अपघात झाला. त्यात अजित पवार यांचं निधन झालं. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. त्यांचं निधन हा फक्त राष्ट्रवादी, पवार कुटुंबियच नाही तर महाराष्ट्रावर झालेला मोठा आघात आहे. आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
“अजित पवार हा कर्तुत्ववान नेता होताच. पण त्याचं आणखी एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे दैनंदिन कामाची सुरुवात सकाळी ६ -७ वाजल्यापासून करायचा. आता हयात असते तर घरी दिसले नसते फिल्डवर दिसले असते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कर्तुत्ववान नेते सोडून जाणं हा महाराष्ट्रावर मोठा आघात आहे” असं शरद पवार म्हणाले.
जी पद्धत होती, ती चालू ठेवावी लागेल
“तो आघात आम्हा सगळ्यांवर झाला आहे. या परिस्थितीत लोकांचं दु:ख कमी करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. त्याची काम करण्याची जी पद्धत होती, ती चालू ठेवावी लागेल आणि हे काम आमच्या कुटुंबातील नवीन पिढी नक्की करेल हा विश्वास नक्की आहे” असं शरद पवार म्हणाले. “आम्हा लोकांची काही जबाबदारी आहे. नव्या पिढीची जास्त आहे. नवीन पिढी या आव्हानाला सामोरी जाईलं” असं शरद पवार म्हणाले.
त्यांनी ठरवलेलं दिसतय
दादा जाऊन अजून 48 तास, 72 तासही उलटलेले नाहीत, तरी त्यांच्या पदाबाबत चर्चा सुरु आहे, याकडे तु्म्ही कसं पाहता, घाई होतेय का?. यावर शरद पवार म्हणाले की, ‘त्या विषयाची आम्ही चर्चाच करत नाही. ही चर्चा मी मुंबईत पाहतोय’. “प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा तो अधिकार आहे. त्यांनी काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतय. यावर मी अधिक भाष्य करणार नाही” असं शरद पवार म्हणाले.
