Nashik Vidhan Parishad : महायुतीच्या लोकांनी माझा विश्वासघात केला..; गोकुळ गीतेंच्या विजयानंतर नरेंद्र दराडेंची पहिली प्रतिक्रिया
शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाल्याचं कळतंय. यानंतर नरेंद्र दराडे यांनी त्यांचा विश्वासघात झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये महायुतीला मोठा झटका मिळाला आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाल्याची माहिती समोर येत आहे. याबद्दलची फक्त औपचारिक घोषणा बाकी असल्याची सूत्रांची माहिती आहे. या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “माझा विश्वासघात झाला आहे. महायुतीच्या लोकांनी माझा विश्वासघात केला,” अशा शब्दांत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे साहेब सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझा घात केला, असं ते म्हणाले.
काय म्हणाले नरेंद्र दराडे?
“महायुतीमध्ये असून सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा विश्वासघात केला आहे. आतून त्यांना पाठिंबा दिला. त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली. मी आशेवर राहिलो. मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो. महायुतीच्या सर्व नेत्यांनी मला अंधारात ठेवून पाडलं. मला अंधारात ठेवून त्यांनी त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली,” अशी प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी पराभवानंतर दिली आहे.
नाशिकमधील बंडखोरी
विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात प्रबळ अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांच्यासाठी भाजपच्या काही प्रमुख नेत्यांसह शिवसेना शिंदे गटातील एका आमदाराने पडद्यामागून मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळे निकालानंतर आता दोन्ही पक्षातील वाद चिघळला आहे. नाशिक मतदारसंघासाठी 619 पैकी 618 (99.84%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित उमेदवारांच्या बंडखोरीमुळे नाशिकची निवडणूक चांगलीच गाजली.
महायुतीला झटका
बंडखोरांना थोपवण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांना वारंवार नाशिकमध्ये जावं लागलं. माघारीची मुदत संपल्यानंतर भाजपचे बंदखोर प्रसाद हिरे आणि भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते यांची मंत्री सामंत यांना अक्षरश: मनधरणी करावी लागली होती. नाशिक मतदारसंघात गेले दहा दिवस नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. गोकुळ गीते यांची बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत, गिरीश महाजन आणि दादा भुसे या तीन मंत्र्यांना नाशिकमध्ये ठाण मांडावी लागली होती. आता या निकालाने महायुतीला मोठा झटका मिळाला आहे. नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर गोकुळ गीते समर्थकांचा मोठा जल्लोष सुरु आहे. गोकुळ गीते यांना 389 मतं मिळाल्याची माहिती समोर येत आहे.