‘पालकमंत्री असतानाही माझ्या जिल्ह्यातील कामे खोळंवली…’, शिवसेना मंत्र्याने खदखद व्यक्त करत मांडले जाहीर दुःख

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे नोंदवलेल्या आक्षेपामुळे निधी थांबला आहे. परंतु या निधीबाबत कोणताही संवाद त्यांनी साधला नाही, असा आरोप शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

पालकमंत्री असतानाही माझ्या जिल्ह्यातील कामे खोळंवली..., शिवसेना मंत्र्याने खदखद व्यक्त करत मांडले जाहीर दुःख
माध्यमांशी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक
| Updated on: Jun 14, 2025 | 9:02 AM

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे सरकार अस्तित्वात आले. या सरकारमधील मतभेद गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. आता शिवसेनेचे बडे नेते आणि धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मनातील खदखद जाहीरपणे व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून महायुतीत मतभेद यानिमित्ताने समोर आले आहे. धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या विकास निधीला स्थगिती दिली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र

शिवसेना नेते आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, पालकमंत्री असताना माझ्या जिल्ह्यात कामे खोळंबली आहे. त्यामुळे मी दुःखी आहेत. माझे दु:ख राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडले आहे. यानंतर प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्रसुद्धा माध्यमांना दिले.

भाजप आमदारावर ठपका

भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे नोंदवलेल्या आक्षेपामुळे निधी थांबला आहे. परंतु या निधीबाबत कोणताही संवाद त्यांनी साधला नाही. संवादाला प्रतिसादही ते देत नाहीत, असा प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात राणाजगजित सिंह पाटील यांच्यावर ठपका ठेवला आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, निधीची स्थगिती उठवण्यासाठीच्या तीन ते चार बैठका झाला. परंतु त्या बैठकीत तोडगा नाही. विकास कामांना स्थगिती देणार सरकार नसून प्राधान्य देणारे सरकार हा संदेश जनतेत जाणे गरजेचे आहे.

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या विकास निधीला स्थगिती दिली आहे. धाराशिव आकांक्षीत जिल्हा असताना अनेक विकास कामे खोळंबली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही स्थगिती उठवण्याची मागणी केली आहे. २०२४- २५ मध्ये पालकमंत्री म्हणून तानाजी सावंत हे काम पाहत होते. तेव्हा वितरित केलेल्या निधीस स्थगिती देण्यात आली आहे.