
रामू ढाकणे, प्रतिनिधी : देशभरातील विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खासकरून राहुल गांधी अनेकदा सत्ताधारी पक्षांवर मतचोरीचाही आरोप केला आहे. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित करत असताना आता सत्ताधारी पक्षातील नेतेही तीच भाषा वापरू लागले आहेत. रावसाहेब दानवे यांनी कोणत्या आमदारावर हा आरोप केला ते जाणून घेऊयात.
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल, परंतु ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडलेले आहे त्या ठिकाणचा निकालाची आम्ही खात्री देऊ शकत नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना दानवे यांनी, मी बोगस मतदारांचा पुरावा दिलेला आहे, नाव एकाच फोटो दुसऱ्याचा. भोकरदन मधील 3 हजार 200 नाव सिल्लोडमध्ये आहेत आणि ते मी निवडणूक आयोगाला देणार आहे. बाहेरून मतदार घेऊन आणि त्यांचं मतदान डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य नाही. विधानसभेला सुद्धा तेच झालं आणि 100% अब्दुल सत्तारांचा विजय हा बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे.
काँग्रेस नेत्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना दानवे यांनी म्हटले की, ‘त्यांचा लोकशाहीवर कुठे भरोसा आहे आणि ते कुठे लोकशाही मानतात? त्यांनी जर लोकशाही मानली असती तर विरोधी पक्षाच्या लोकांना आणीबाणी मध्ये जेलमध्ये टाकलं नसतं. यांचा सरकारवर भरोसा नाही, निवडणूक आयुक्तावर भरोसा नाही, जनतेवर भरोसा नाही. यांनी मत चोरीचा मुद्दा घेऊन बिहारची निवडणूक लढवली तर तिथल्या जनतेने यांना उत्तर दिलेले आहे. शेवटी असं होईल राहुल गांधी जर व चोरीचा मुद्दा नेहमी उपस्थित करतात आणि नेहमी हरत आहेत. त्यामुळे त्यांचे जे मित्र आहेत ते सुद्धा यांच्याबरोबर राहणार नाहीत.