निवडणूक आयोगाला परत एकदा सांगतो.., उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा, निर्धार मेळाव्यात कडाडले

आज शिवसेना ठाकरे गटाचा मुंबईमध्ये निर्धार मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला इशारा देखील दिला.

निवडणूक आयोगाला परत एकदा सांगतो.., उद्धव ठाकरेंचा निर्वाणीचा इशारा, निर्धार मेळाव्यात कडाडले
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2025 | 8:07 PM

आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला, या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी यावेळी निवडणूक आयोगाला देखील इशारा दिला आहे. हुकूमशाही येऊ द्यायची नसेल तर हीच वेळ आहे. निवडणूक आयोगाला परत सांगतो चुका दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला निवडणूक घेता येणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांना ओरबाडायचं आहे. संपवून टाकायचं आहे. त्यासाठी त्यांना सत्ता आणायची आहे. आपल्यावर हुकूमशाही येऊ द्यायची नसेल तर हीच वेळ आहे. निवडणूक आयोगाला परत सांगतो चुका दुरुस्त केल्याशिवाय तुम्हाला निवडणूक घेता येणार नाही. आम्ही दोन निवडणूक आयुक्तांना भेटलो, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे जायला सांगितलं. आम्ही दोघांना एकत्र भेटलो, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, लोकसभेत यश मिळालं, विधानसभेत २० जागा?  हरू शकतो आपण. मी कोरोनाच्या काळात मुस्लिमांसह सर्वांशी समानतेने वागलो. तो मतदार एवढा माझ्याशी उफराटा वागू शकतो? हा मतदारांचा कौल नाही. हा यांच्या पैशाचा माज आहे.
उद्या यांचे चटर फटर लोक चिरकतील. चिरकू द्या, उत्तर देऊ नका. त्यांना त्याचा पगार मिळतो. ते आपल्याला डिस्टर्ब करतात, ते नामर्द आहेत म्हणून आपल्या लोकांना तोडून फोडून आपल्यावर पाठवत आहेत. आपल्याच दोन माणसांमध्ये भांडणं लावत आहेत. ही भाजपची अवसानघातकी पद्धत आहे. अंधभक्तांना सांगतो डोळ्यावर पट्टी घालून जाऊ नका. पट्टी उघडेल तेव्हा कळेल, घराण्याचं घराणं खाईत पडलेलं असेल. निवडणूक याद्यात दोन गोष्टी असतात, फ्रॉड आणि फॉल्स. चूक होऊ शकते, पण हा फ्रॉड आहे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे. तसेच यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावरून देखील जोरदार टीका केली आहे, दोन व्यापाऱ्यांचा मुंबईवर डोळा आहे, एक आज येऊन गेला, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.