विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरेंचा मोठा निर्णय, 3 बड्या नेत्यांची थेट पक्षातून हाकालपट्टी, ठाकरे गटात मोठी खळबळ
एकीकडे सध्या राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीन नेत्यांची पक्षातून तडकाफडकी हाकालपट्टी केली आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात वेगवान घडमोडी घडल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अनेक जणांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली होती. या बंडखोरीचा सर्वाधिक फटका हा महायुतीला बसेल असं चित्र होतं. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ही बंडखोरी रोखण्यात महायुतीला मोठ्या प्रमाणात यश आलं. मात्र अजूनही काही मतदारसंघात बंडखोरांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मात्र या उलट महाविकास आघाडीमध्ये परिस्थिती पहायला मिळाली. महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी जे उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले होते, त्यातील काही जणांनी अचानक आज निवडणुकीतून माघार घेतली. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटानं बाळ माने यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता पक्षाकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे, त्यांची पक्षातून तडकाफडकी हाकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर -जालना मतदारसंघातून देवयानी डोनगावकर यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी देखील अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून देवयानी डोनगावकर आणि कृष्णा डोनगावकर यांची देखील पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायात सहभागी झाल्याचा ठपका या सर्व नेत्यांवर ठेवण्यात आला आहे, शिवसेना ठाकरे गटाकडून या तीनही नेत्यांची तडकाफडकी हाकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र या सर्व प्रकरामुळे आता वातावरण चांगलंच तापलं आहे.