मनसेसोबत युतीची बोलणी सुरू असतानाच ठाकरे गटाचा मोठा निर्णय, राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड, नवा ट्विस्ट
महापालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युतीची बोलणी सुरू आहेत, मनसेसोबत बोलणी सुरू असतानाच आता शिवसेना ठाकरे गटानं मोठा निर्णय घेतला आहे.

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे, या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. युती आणि आघाड्यांचं समिकरण जुळताना आणि बिघडताना पहायला मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती होणार आहे, युतीसंदर्भातील बोलणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजूनही काही जागांवर तिढा कायम असल्यानं युतीसंदर्भातील अधिकृत घोषणा होऊ शकलेली नाहीये, जागा वाटप जोपर्यंत निश्चित होत नाही, तोपर्यंत युतीची घोषणा नको अशी मनसेची भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडू मिळत आहे. 9 जागांसंदर्भात हा तिढा असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान आज मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे, त्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीची अधिकृत घोषणा होऊ शकते. तर दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे हे एकत्रित लढणार आहेत, राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी आपल्या कोट्यातून जागा देण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटानं दर्शवली आहे.
दरम्यान एकीकडे या घडामोडी घडत असताना दुसरीकडे वसई-विरारमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बहुजन विकास आघाडीसोबत युतीची बोलणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचं शिष्टमंडळ हिंतेंद्र ठाकूर यांची भेट घेण्यासाठी दाखल झालं आहे. या शिष्टमंडळामध्ये मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, विलास पोतनीस, अमोल कीर्तीकर यांचा समावेश आहे. विवा कॉलेज येथील कार्यालयात हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते लोकलने प्रवास करत विरारला पोहोचले आहेत, त्यामुळे आगामी वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच युती झाल्यास जागा वाटपाचं सूत्र नेमकं कसं ठरणार? याबाबतही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
