संजय राऊत यांची कन्या विधिता आणि राहुल गांधी लंडनमध्ये समोरासमोर, अचानक भेट, नेमकं काय घडलं?
खासदार संजय राऊत यांची कन्या विधिता आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची लंडनमध्ये भेट झालीय. त्यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. विधाता ही व्यावसायिक फॅशन डिझायनर आहे. ती संजय राऊत यांची धाकटी मुलगी आहे.

मुंबई | 13 सप्टेंबर 2023 : ठाकरे गटाचे मुलूख मैदान तोफ आणि तडफदार नेते अशी ख्याती असलेले राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचे विविध पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. महाराष्ट्रात गेल्या वर्षी मोठा राजकीय भूकंप घडून आल्यानंतर संजय राऊत भाजप आणि शिंदे गटावर तुटून पडले होते. त्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय राऊत यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागलं. पत्राचार घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी संजय राऊत यांना जेलमध्ये जावं लागलं होतं.
संजय राऊत यांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्या कुटुंबासाठी तो दिवस खूप कठीण होता. राऊतांना अटक केली त्यादिवशी त्यांची धाकटी कन्या विधिता आपले काका सुनील राऊत यांच्यासोबतल प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर दिसली होती. विधिता हिचं आपल्या वडिलांसोबत खूप भावनिक नातं आहे. याबाबत तिने याआधी काही मुलाखतींमध्येही सांगितलं आहे. या विधिताची आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची लंडनमध्ये भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या दोघांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे.
अचानक भेट घडून आली
विधिता ही व्यावसायिक फॅशन डिझायनर आहे. ती एका असाईनमेंटसाठी सध्या लंडन येथे गेली आहे. या दरम्यान लंडनच्या पॅडिंग्टन येथे विधिता आणि राहुल गांधी यांची भेट झाली. विधिता राहात असलेल्या हॉटेलबाहेर हा प्रसंग घडला. हॉटेलात प्रवेश करीत असलेल्या राहुल गांधी यांच्याशी तिची अचानक भेट झाली.
राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. या दरम्यान विधिता राहत असलेल्या हॉटेलच्या बाहेर तिची आणि राहुल गांधी यांची अचानक भेट झाली. याआधी काही कौटुंबिक सोहळ्यांच्या प्रसंगी विधिता यांची राहुल गांधी यांच्याशी भेट झाली होती. राहुल गांधी आणि विधिता राऊत यांच्या अचानक झालेल्या भेटीचा क्षण काहींनी कॅमेरात कैद केलाय.
महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर ऐतिहासिक अशा महाविकास आघाडीची स्थापना झाली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी स्थापन झाली. या तीनही पक्षांनी सरकार स्थापन केलं आणि अडीच वर्ष सरकार चाललं. यानंतर शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. राज्यात सत्तांतर घडून आलं. या दरम्यानच्या काळात संजय राऊत आणि राहुल गांधी यांची अनेकवेळा भेट झाली.
संजय राऊत राज्यसभेतही रोखठोकपणे आपली भूमिका मांडत असतात. याशिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये संजय राऊत आणि राहुल गांधी यांची भेट झालीय. इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीवेळी संजय राऊत यांचं वावरणं, देहबोली बरंच काही सांगत होती. त्यांचे राहुल गांधी यांच्यासोबत चांगले संबंध स्थापन झालेले बघायला मिळालं. यातून राहुल गांधी आणि संजय राऊत यांची जवळीक दिसून आली. पण संजय राऊत यांची कन्या आणि राहुल गांधी यांची ही लंडनमध्ये झालेली भेट अचानक झाली आहे.
