महाराष्ट्रातील ईव्हीएमची पॅकींग सुरु, पश्चिम बंगालमध्ये जाणार, संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप काय?
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी अजित पवार यांचा राजीनामा मागितला. लाडक्या बहिणींनी नव्हे तर लाडक्या भावांनीही या योजनेचा लाभ घेतला. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आणि तुम्ही लाभ घेऊ दिला...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत खळबळजनक आरोप केला आहे. सन २०२६ मधील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, असा दावा भाजप नेते अमित शाह यांनी केला होता. त्यासंदर्भात बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील ईव्हीएम पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी पाठवण्याची योजना आहे. त्यासाठी पॅकिंग सुरु आहे. यामुळे २०२६ मध्ये बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर येईल, या अमित शाह यांच्या दाव्यात तथ्य आहे.
अजित पवार यांचा राजीनामा मागितला
अर्थमंत्री अजित पवार यांचा संजय राऊत यांनी राजीनामा मागितला. ते म्हणाले, लाडक्या बहीण योजनेच्या माध्यामातून अर्थखात्यातून मोठा घोटाळा झाला आहे. त्याला अजित पवार जबाबदार आहात. कारण लाडक्या बहिणींनीच नव्हे तर लाडक्या भावांनी या योजनेचा लाभ घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आणि या सर्वांना तुम्ही लाभ घेऊ दिला. योजनेसाठी आलेल्या अर्जांची छननी केली नाही. कारण तुम्हाला मते हवी होती. आता त्याचे प्रायश्चित घेऊन तुम्ही राजीनामा द्या. या राज्याचे पैसे तुम्ही लूट दिले. त्यामुळे तुम्ही राजीनामाच दिला पाहिजे, असे राऊत यांनी म्हटले.
राज्यमंत्र्यांना अजूनही कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार देण्यात आले नाही? या प्रश्नावर संजय राऊन यांनी सांगितले की, राज्यमंत्र्यांना अधिकार नाही, असे तुम्ही विचारत आहात. परंतु राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांना तरी अधिकार आहे का?. राज्यातच नाही तर केंद्रातही मंत्र्यांना अधिकार नाही. अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या पीएच्या खोलीत दोन कोटी रुपये सापडले, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, इतरांवर कारवाई काय होणार? असे एका प्रश्नाच्या उत्तरात संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी कुंभमेळ्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. हे पॅकेज प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात आपण पाहिले आहे. कुंभमेळ्यातील या सर्व कामांची ठेकेदारी गुजरातमधील ठेकेदारांना मिळणार आहे. आमचे साधू भजन करत येतील आणि स्नान करुन निघून जातील, असे राऊत यांनी कुंभमेळ्यातील घोषणेवर टीका करताना म्हटले.
