ठरलं! मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गट या बड्या नेत्याच्या नेतृत्वात लढणार
पुढील काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे, या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी समोर आली आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटक पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे. बीएमसीमध्ये कोणाचा झेंड फडकणार? महायुती की महाविकास आघाडी? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना शिंदे गट शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्व आणि नियोजनाखाली लढणार आहे. मुंबई महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व व नियोज असणार आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. उद्याच्या शिवसेना मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांची राजकारण आणि विकासासंदर्भात जाहीर मुलाखत होणार असल्याची माहीत देखील समोर येत आहे.
‘मातोश्री’वर बैठक
दरम्यान दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानं देखील आता मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजा मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना मनसेसोबतच्या युतीबाबत विचारणा केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी माजी नगरसेवकांनी मनसेसोबतच्या युतीसाठी अनुकूल मत व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणूक होऊ शकते. तुम्ही आजही पक्षासोबत आहात, तुम्ही निष्टावान आहात. युतीसंदर्भातील कोणताही निर्णय तुम्हाला विश्वासात घेऊनच घेतला जाईल. लवकरच महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भवनात निवडणूक कार्यालय सुरू केलं जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या निवडणुकीसाठी एकत्र येणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
