
राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी निधीवाटपाच्या मुद्द्यावरून शिंदे यांच्या मंत्र्यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवलेली आहे. त्यानंतर आता महायुतीत अंतर्गत होणाऱ्या पक्षांतरामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर थेट बहिष्कार घातला आहे. आजच्या बैठकीला जवळपास सर्व नेते गैरहजर होते. याबाबत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीवर बोलताना म्हटले की, कुणीही मंत्री नाराज नाही, आज एकनाथ शिंदे बैठकीला हजर होते. आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छानणी सुरू आहे. त्यामुळे भाजपसह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री प्रभारी असलेल्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे बैठकीला मंत्र्यांची संख्या कमी होती, बाकी काही नाही. हे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे याला नाराजी म्हणाता येणार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील अनेक नेत्यांनी युतीतीलच दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. याबाबतच्या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, एकामेकांच्या पक्षात प्रवेश करायचा नाही हे ठरलेलं आहे. पण मधल्या काळात काही अपरिहार्य घटना घडल्या. त्यामुळे काही लोक भाजपमधून शिवसेनेत गेले, शिवसेनेचे काही लोक राष्ट्रवादीत गेले, काही लोक आमच्यात आले असे काही पक्षप्रमुख झाले आहेत.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘या झालेल्या सर्व प्रकाराबाबत तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते याबाबत बसून निर्णय घेतील. पण ही गोष्ट खरी आहे की, आमचे काही पदाधिकारी किंवा माजी लोकप्रतिनिधी शिवसेनेत गेले, काही राष्ट्रवादीत गेले, काही आमच्यात आले, त्यामुळे काही प्रमाणात नाराजी तयार झाली असेल. पण आजच्या बैठकीचे हे कारण नव्हते.’ दरम्यान, शिवसेनेच्या मंत्र्यांच्या या नाराजीमुळे महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. आता आगामी काळात ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.