देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली, संजय राऊतांनी सर्वच सांगितलं, म्हणाले एकाच वेळी…
संजय राऊतांनी फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीबाबत मोठे खुलासे केले आहेत. त्यांनी या भेटीमध्ये मराठी माणसाच्या भवितव्यावर एकतर्फी चर्चा झाल्याचा दावा केला आहे. राऊतांच्या मते, फडणवीस यांनी अदानींना मुंबईची जमीन दिल्याने मराठी माणसाचे भवितव्य धोक्यात आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे राजकारण तापल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या चांगलाच वेग आला आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले. एकीकडे शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने मात्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे, असा दावा केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून हा दावा करण्यात आला आहे. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात नेमकी कोणत्या कारणासाठी भेट झाली, याबद्दलची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे यांच्यात मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी, असा टोला संजय राऊतांनी लगावला.
महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस व राज ठाकरे हे गुरुवारी सकाळी वांद्र्याच्या ‘ताज’ हॉटेलात भेटले. दोघांत मराठी माणसांच्या भविष्याबद्दल चर्चा झाली असावी, पण ती एकतर्फीच असावी. श्री. फडणवीस हे मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करू पाहणाऱ्या गौतम अदानींचे उघड समर्थक आहेत. फडणवीस काळात मुंबईच्या सर्व जमिनी अदानी यांना दिल्या. मुंबईला भिकारी करून सर्व माल गुजरातला नेण्याचा हा डाव आहे काय? असा प्रश्न राज ठाकरे यांनी फडणवीस भेटीत विचारला असावा अशी आशा आहे. मोदी व शहा यांना हवे तेच फडणवीस करणार व अमित शहा हे मुंबईकडे व्यापार म्हणून बघतात. फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली याची इत्थंभूत माहिती माझ्याकडे आहे. फडणवीस हे एकाच वेळी सगळ्यांना खेळवू पाहतात. महाराष्ट्रातील प्रत्येक पक्ष आपल्या तालावर चालतो व नेते त्याच तालावर नाचतात असे त्यांना वाटते. महाराष्ट्रात सध्या मदाऱ्यांचा खेळ सुरू आहे इतकेच”, असे संजय राऊत म्हणाले.
“मुंबई, महाराष्ट्र आणि देशात लोक किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राजकारणी अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. पुन्हा राजकीय कामाला सुरुवात करतात. मुंबईसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने राजकारण व मदाऱ्यांचा खेळ सुरू झाला आहे. मराठी माणूस मुंबईत संपवला जातोय याची चर्चा कोणी करत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांच्या चर्चेत आणि विचारात मराठी माणूस असण्याची शक्यता नाही. कारण त्यांनी मुंबई गौतम अदानी यांना आंदण दिली आहे. राज्यकर्ते कोणीही असोत, सामान्य माणसे किड्या-मुंग्यांसारखी मरतच आहेत व राजकारणी तेवढ्यापुरते अश्रू ढाळण्याचे ढोंग करतात. मुंबईत चालत्या लोकलमधून 13 प्रवासी पडले. त्यातले चार जण मरण पावले. राजकारण्यांनी खोटे अश्रू ढाळले व पुन्हा राजकारण करायला मोकळे झाले. कश्मीर खोऱ्यात पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात 26 मायभगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले. बंगळुरूत एका क्रिकेट टीमचा विजयोत्सव साजरा करण्यासाठी हजारो लोक जमा झाले. त्या गर्दीत इतकी चेंगराचेंगरी झाली की, त्यात 11 लोकांना प्राण गमवावे लागले. मणिपुरात पुन्हा हिंसाचार उफाळला व त्यात नव्याने लोक बळी पडत आहेत. या भयंकर चित्राने 11 वर्षे राज्य करणारे मोदी जराही विचलित होत नाहीत. ते निर्विकार चेहऱ्याने सत्तेच्या खुर्चीवर विराजमान आहेत. फक्त कश्मीरातील पहलगाम येथील हल्ल्यातच नव्हे, तर बंगळुरू, मुंबई, मणिपुरातील घटनांतही मृत्यूच झाले व तेथेही कुणाचे तरी कुंकूच पुसले गेले, पण सरकारला त्याचे काय?” असा सवाल संजय राऊतांनी केला.
ही महाराष्ट्राची लूट
“सरकार राजकारण व त्यातून पैसा गोळा करण्यात गुंतले आहे. मुंबईपासून झारखंड, छत्तीसगढच्या जंगलापर्यंत सरकारचे लोक ठेकेदार, उद्योगपतींकडून पैसा जमा करीत आहेत. सरकारला आता कोणत्याही संवेदना उरलेल्या नाहीत. सरकार ही संस्था निर्दय आणि कोणताही परिणाम न होणारी अशी असते. मुंबई महापालिकेची लढाई आता सुरू आहे. चार वर्षे मुंबई पालिकेवर लोकप्रतिनिधींचे राज्य नाही. मुख्यमंत्र्यांना ‘रिपोर्टिंग’ करणारा प्रशासक तेथे आहे. या काळात कमिशनबाजीतून 34 हजार कोटी रुपये संबंधितांच्या खासगी तिजोरीत गेले. यातला किती वाटा फडणवीस व किती शिंदे यांना मिळाला तो आकडा समजला म्हणजे जनता राज्यकर्त्यांच्या कर्तबगारीवर फुले उधळायला मोकळी. मुंबईतून 34 हजारांवर कोटींची कमाई केली. महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे कोणती महानगरपालिका किती कोटींना लुटली हे समजून घेणे रंजक आहे. या देशात जो काळा पैसा निर्माण होतो त्याचे प्रमुख केंद्र मुंबई आहे. दर तासाला देशात पावणेदोनशे कोटी रुपयांचा काळा पैसा निर्माण होतो. तो सर्व 365 दिवस होतो. त्यात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे. आता तर भाजपने गौतम अदानी यांची वरातच मुंबईत आणली व त्यांना संपूर्ण मुंबई आंदण दिली. अदानी त्यांच्या लुटीचा वाटा या राज्यकर्त्यांना देणार. त्यामुळे सगळेच खूश. या पैशांची पूजा करण्यासाठी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात महाराष्ट्राचे मंत्री जातील. प्रशासकाच्या काळात मुंबई महानगरपालिकेची लूट झाली. धारावी विकासाच्या नावाखाली गौतम अदानी यांना मुंबईतील अनेक मोक्याचे भूखंड फडणवीस यांनी दिले. धारावीचा भूखंड माहीम, माटुंगा, दादरच्या जवळ आहे. त्याशिवाय कुर्ला डेअरी, दहिसर टोल नाका, मुलुंड डम्पिंग ग्राऊंड, मिठागरे अशा जमिनींचा मलिदादेखील धारावी विकासाच्या नावाखाली अदानी यांना दिला जात आहे. ही महाराष्ट्राची लूट आहे व ती उघडपणे सुरू आहे”, असा आरोप संजय राऊतांनी केला.
ही सरळ लाचखोरी
“या सर्व व्यवहारांत भाजप, फडणवीस, शिंदे, अमित शहा यांना किती मलिदा मिळणार आहे? ही सरळ लाचखोरी आहे. महाराष्ट्राच्या उद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांत व विभागांत आज सर्वाधिक भ्रष्टाचार सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाची एकही फाईल पैसे दिल्याशिवाय सरकत नाही. मंत्रालयापासून ते एसआरएपर्यंत हेच प्रकार सुरू आहेत. गरीबांच्या घरांसाठी सुरू केलेल्या योजना बिल्डर आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पकडीत अडकल्या. त्यामुळे मुंबईतून मराठी माणूस बाहेर पडला. त्याचे दुःख सगळ्यांना व्हायला हवे”, असेही रोखठोकमध्ये म्हटले आहे.
