“एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा वादा भाजपने केलाय का?”, ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सवाल
गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु आहेत. यावरुन सत्ताधारी आमदार टीका करताना दिसत आहेत. आता ठाकरे गटाचे मोठ्या नेत्याने यावर हल्लाबोल केला आहे.

येत्या विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. त्यातच आता सर्वच पक्ष कोणकोणत्या जागांवरुन विधानसभा निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत. आता सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमध्येही मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. “ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला न ठेवता आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करा”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मात्र शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची मागणी अमान्य केली आहे. निकालानंतर संख्याबळाच्या आधारावरच मुख्यमंत्रिपदाचं ठरेल, असं शरद पवार म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु आहेत. यावरुन सत्ताधारी आमदार टीका करताना दिसत आहेत. आता ठाकरे गटाचे मोठ्या नेत्याने यावर हल्लाबोल केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकासआघाडी यांचा मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर राजकारण सुरु आहे. “ज्याचे आमदार अधिक त्याचा मुख्यमंत्री हा फॉर्म्युला न ठेवता आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निश्चित करा”, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यावर शरद पवारांनी निकालानंतर संख्याबळाच्या आधारावरच मुख्यमंत्रिपदाचं ठरेल, असे म्हणत ठाकरेंची मागणी फेटाळली.
संजय शिरसाठ काय म्हणाले होते?
यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “उबाठा’ गटाला कशाप्रकारे संपवायचे, याची पद्धतशीरपणे शरद पवार यांनी आखणी केली आहे. जास्त आमदार निवडून आणायचे असतील तर जास्त जागा मागाव्या लागतील. जास्त जागा कुणाला भेटतील, हाच महाविकास आघाडीतील सर्वात मोठा प्रश्न आहे. महाविकास आघाडी आता बिघाडीवर आली आहे. त्याची सुरुवात शरद पवार यांनी केली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला स्विकारत नाही, हे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत”, असे संजय शिरसाठ म्हणाले.
अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
त्यावर आता विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तुमच्या इथे काय शिजत आहे, ते तुम्ही पहिल्यांदा बघा. तुमच्या एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा वादा हा भाजपच्या लोकांनी दिला आहे का?” असा सवाल अंबादास दानवेंनी केला. महाविकासआघाडीमध्ये समन्वय आहे, असेही अंबादास दानवे यावेळी म्हणाले.
“त्याचं नेतृत्त्व कुचकामी“
“गृहमंत्री अमित शहा यांना उद्धव ठाकरे यांनी अहमद शहा अब्दाली असं नाव दिलं आहे. त्यामुळे इथे येऊन त्यांचं काही होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इथे येऊन ३० सभा घेतल्या होत्या, तरी पराभव झाला ना? इथे येऊन ते दाखवत आहेत की इथलं त्याचं नेतृत्त्व हे कुचकामी आहे. यांनी जे फोडाफोडीचं राजकारण केलं, त्यांचे प्रमुख हे अमित शाह आहेत”, असे अंबादास दानवे यांनी केली.
