बाळा माझ्याकडे ये.., स्वप्नात आई आली अन् मुलानं उचललं टोकाचं पाऊल, सोलापुरातील धक्कादायक प्रकार
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आईच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यानं एका 16 वर्षांच्या तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे.

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, आईच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्यानं एका 16 वर्षांच्या तरुणाने फासी घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे. विशेष म्हणजे डॉक्टर व्हायचं या मुलाचं स्वप्न होतं, तो त्यासाठी नीट परीक्षेची देखील तयारी करत होता. शिवशरण भुटाली असं या तरुणाचं नाव आहे.
शिवशरण हा एक अत्यंत हुशार असा विद्यार्थी होता, त्याने दहावीमध्ये 92 टक्के गुण मिळवले होते, डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं, आपला मुलगा डॉक्टर व्हावा अशी त्याच्या आईची देखील इच्छा होती, मात्र काही दिवसांपूर्वी कावीळमुळे शिवशरणच्या आईचा मृत्यू झाला, त्याला आपल्या आईच्या मृत्यूचा प्रचंड धक्का बसला होता, याच धक्क्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं, त्याने आपलं आयुष्य संपवलं आहे. पोलिसांना त्याच्याजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आईच्या मृत्यूनंतर शिवशरण आपल्या काकांकडे राहात होता, तिथेच त्याने आत्महत्या केली. तीन महिन्यांपूर्वी त्याच्या आईचा मृत्यू झाला होता.
पोलिसांना शिवशरणजवळ एका सुसाईड नोट देखील आढळून आली आहे, त्यामध्ये या मुलानं असं लिहिलं आहे की, ‘मी शिवशरण आहे, मी मरत आहे, कारण मला आता जगावसं वाटत नाही, मला तेव्हा मरायला पाहिजे होतं, जेव्हा माझ्या आईचा मृत्यू झाला, पण मी माझा काका आणि आजीचा चेहरा पाहून जिवंत होतो, काल माझी आई माझ्या स्वप्नात आली, माझ्या आईने मला विचारलं की तू इतका उदास का आहेस? आणि मला तिने आपल्याकडे येण्यास सांगितलं, त्यामुळे मी हा निर्णय घेतला. मी माझे काका आणि आजीचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला माझ्या आईचा मृत्यू झाल्यानंतर खूप जीव लावला, काका मी आता मरत आहे, माझ्या बहिणीला आनंदी ठेवा, माझ्या मृत्यू पश्चात माझ्या बहिणीला आणि आजीला बाबांकडे पाठवू नका, सर्व लोकांनी काळजी घ्या, तुम्ही माझ्यावर माझ्या आई-वडिलांपेक्षाही जास्त प्रेम केलं’ असं या सुसाईड नोटमध्ये लिहील आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
