
Maharashtra Rain Update : सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी, सामान्य लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम केले आहे. काही ठिकाणी लोकांच्या घरात पाणी शिरले असून संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाल आहे. गेल्या कित्येक वर्षांत अशा प्रकारचा पाऊस झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या पावसाचा सर्वाधिक तडाखा यावेळी मराठवाड्याला बसला आहे. सध्याची ही परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी, सामान्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासानेही एक मोठा निर्णय घेतला आहे. मंदीर न्यासाने अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 10 कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे.
श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासाने मदतीचा निर्णय घेतल्यानंतर मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. या माहितीनुसार श्री सिद्धीविनायक मंदीर न्यासाकडून अतिवृष्टीबाधीतांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. हा सर्व निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. ‘महाराष्ट्रा राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पुरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्री सिद्धीविनायक गणपती न्यासाने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे न्यासाच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूग यासारखी पिके तर वाहून गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली जातेय. तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कारवा, अशीही भूमिका विरोधकांनी घेतली आहे. झालेले नुकसान फार मोठे आहे, असे राज्य सरकारचे मत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार केंद्र सरकारकडे आर्थिक मदत मागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारतर्फे नेमकी किती मदत दिली जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांना किती मदत करणार याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.