Solapur News : सोयाबिन शेतकऱ्याचा ४ लाखांचा चेक बँकेतून चोरीला गेला,घोर कलियुग आले
सोयाबिन कंपनीला देऊन त्यातून मिळालेला धनादेश वटवलेले पैसे आणायसाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला त्याच्या खात्यात पैसेच नसल्याचे उघड झाले. मग कंपनीने दिलेला चेक कुठे गेला.? हा चेक चोरट्याने चोरल्याचे उघडकीस आल्याने शेतकरी हवालदील झाला आहे.

सोयाबिनच्या मिळालेला चार लाखांच्या बिलाचा चेक बँकेच्या ड्रॉप बॉक्समधून चोरट्याने लंपास करत परस्पर दुसऱ्याच खात्यावर वटवला असल्याची धक्कादायक घटना सोलापूरातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत घडली आहे. या संदर्भात शेतकऱ्याने पोलिसात धाव घेतली असून न्याय देण्याची मागणी केली. विशेष म्हणजे आधी बँकेने या शेतकऱ्याला चेक दिलाच नसल्याचा दावा करीत फेटाळून लावले होते. परंतू सीसीटीव्हीतून चेक दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.
सोलापूरात दोन शाखांमध्ये चेक चोरीला गेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका शेतकऱ्याचा चार लाखाचा चेक चोरीला गेला आहे. या संदर्भात बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला अर्ज दिलेला आहे, त्यामध्ये ठेवीदाराचा चेक चोरीला गेला असा उल्लेख आहे असे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी म्हटले आहे. चोरट्याने चेकच्या स्लिपमध्ये काही तरी दुरुस्ती करण्याच्या कारणाखाली तो ड्रॉप बॉक्समधून काढून घेतला आणि बँक कर्मचाऱ्याची नजर चुकवून त्यात चुकीच्या पद्धतीने वापर करून वेगळ्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात बँक मॅनेजरने विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पाठवण्यात आल्याचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतून एका अज्ञात व्यक्तीने बँकेच्या चेक बॉक्समधून चेक चोरल्याचे उघडकीस आले आहे. हा चेक अमर तेपेदार नामक व्यक्तीने चोरल्याची तक्रार पोलीस आयुक्तांकडे गेली आहे.या संदर्भात बँक प्रशासनाने माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. आमची कार्यालयीन प्रक्रिया सुरु असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्याला सोयाबीनच्या बिलापोटी मिळालेला चेक बँकेत भरल्यानंतर तो चोरून त्यात बदल करत संबंधित चोराने वटवला आहे. बँकेने मात्र शेतकऱ्याला पैसे देण्यासाठी नकार दिला आहे. सुरुवातीला संबंधित शेतकऱ्याने बँकेत चेक भरलाच नसल्याचा कांगावा बँकेकडून केला गेला. मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर बँकेने चूक मान्य केली आहे. सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयकृत बँकेचा भोंगळ कारभार त्यामुळे समोर आला आहे.
मूळचे बार्शीतील असलेल्या उत्तम दत्तात्रय जाधव या शेतकऱ्याच्या नावाचा तब्बल 4 लाख रुपयांचा चेक त्याच्याच खात्यावर जमा होणे अपेक्षित असताना अनोळखी माणसाच्या नावावर त्याचे पैसे जमा झाल्याने शेतकऱ्याची अवस्था बिकट झाली आहे. गेल्या सात ते आठ दिवसापासून संबंधित राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी या शेतकऱ्याला टोलवाटोलवी उत्तरे देत होते. त्यानंतर सोयाबीन उत्पादक शेतकरी उत्तम जाधव यांनी यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली.बँकेचे अधिकारी मात्र चौकशी सुरू असल्याचे कारण देत शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लावत होते.मात्र अखेर बँकेने विजापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली असून तपास सुरु आहे.
