सोलापुरात भाजपची मोठी खेळी, लोकसभेसाठी ‘या’ तरुण नेत्याची उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती

| Updated on: Mar 17, 2024 | 3:37 PM

सोलापुरात भाजप लोकसभा निवडणुकीसाठी एका तरुण चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीकडून सोलापुरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्या तोडीस तोड असा उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

सोलापुरात भाजपची मोठी खेळी,  लोकसभेसाठी या तरुण नेत्याची उमेदवारी जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती
Follow us on

सोलापूर | 17 फेब्रुवारी 2024 : महायुतीचं जागावाटप आता लवकरच निश्चित होणार आहे. भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. असं असलं तरी 28 जागांचे उमेदवार अजून जाहीर करण्यात आलेले नाहीत. या सर्व जागांवर महायुतीतील घटक पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. असं असताना सोलापुरातून मोठी बातमी येत आहे. सोलापुरात महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी भाजप एका तरुण आमदाराला संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या आक्रमक नेत्याला आक्रमक नेत्याकडून उत्तर देता या हेतून भाजपने आमदार राम सातपुते यांची सोलापूर लोकसभेसाठी निवड केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे सोलापूरची लोकसभेची लढत ही अतिशय रंगतदार होण्याचे संकेत मिळताना दिसत आहेत.

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून आमदार राम सातपुते यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विश्वनीय सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला याबाबत माहिती दिली आहे. राम सातपुते यांना पक्षाकडून कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार? या मुद्द्यावरुन सातत्याने चर्चा सुरु होत्या. दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. तशा सूचना त्यांना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानंतर प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रचाराला सुरुवातही झाली आहे. त्यांचे मतदारसंघात दौरे सातत्याने सुरु आहेत.

राम सातपुते भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

प्रणिती शिंदे यांना पर्याय म्हणून भाजपकडून युवा चेहरा म्हणून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली जात असल्याचं मानलं जातंय. भाजपचे आक्रमक चेहरा म्हणून त्यांना पाहिलं जातंय. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय उपाध्यक्षसुद्धा आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत टफ फाईट देण्यासाठी आमदार राम सातपुते यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा दोन दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आता राम सातपुते यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महायुतीचं जागावाटप 24 तासात ठरणार

महायुतीचं जागावाटप येत्या 24 तासात जाहीर होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडून जागावाटपावर भाजप हायकमांडसोबत आजच चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज दिल्लीला जाणार आहेत. त्यांचा आज दिल्ली दौरा रद्द झाला तर ऑनलाईन बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.