Devendra Fadnavis: देवाभाऊचा नाद करायचा नाय…भरसभेत या भाजप नेत्याचा कुणाला इशारा? ZP निवडणुकीत कुणाचा गेम होणार?

ZP Election: महापालिका निवडणुकीचा धुराळा अद्यापही खाली बसलेला नाही. त्यातच आता भाजपच्या या बड्या नेत्याने विरोधकांना थेट शिंगावर घेतले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राज्यात वातावरण तापत आहे. भरसभेत या भाजपच्या या नेत्याने कुणाला इशारा दिला?

Devendra Fadnavis: देवाभाऊचा नाद करायचा नाय...भरसभेत या भाजप नेत्याचा कुणाला इशारा? ZP निवडणुकीत कुणाचा गेम होणार?
देवेंद्र फडणवीस
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Jan 23, 2026 | 11:03 AM

Jaykumar Gore on Devendra Fadnavis: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा धुराळा अद्यापही खाली बसलेला नाही. अजून महापौर पदाचे सोपास्कार सुरू आहेत. अनेक ठिकाणी काँग्रेस, उद्धवसेना, मनसे आणि वंचित मिळून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. अकोला, चंद्रपूर, अमरावतीसह अनेक ठिकाणी असा प्रयोग करण्याची चाचपणी सुरू आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणुकीचे पडघमही वाजले आहेत. जिल्हा परिषदेतही भाजपचा वारू थांबवण्याचे मोठे आवाहन विरोधकांसमोरच नाही तर मित्रपक्षांसमोर आहे. त्यावरून राज्यात भाजपविरुद्ध आम्ही सगळे असं एक राजकारण उभं राहू पाहत आहे. तर आता एका भाजपच्या मंत्र्यानं विरोधकांना सज्जड दम भरला आहे.

देवाभाऊंचा नाद करू नका

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरमधील एका कार्यक्रमात विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेव्हा गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्ष प्रवेश सोहळा झाला. राष्ट्रवादीचे नेते समाधान काळे आणि गणेश पाटील यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. यावेळी माढ्याचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. नाद कुणाचा पण करा, पण देवाभाऊंच्या नादी लागू नका असा सज्जड इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.

भाजपला संपवणारा जन्माला यायचाय

काही जण भाजप आणि नेत्यांना संपवू अशी भाषा करत आहेत. परंतू भाजप संपवणारा अजून जन्माला यायचा आहे. आपल्या क्षमतेने आणि कुवतीप्रमाणे बोलावं. भाजपने हात वर केले, तुमच्या डोईवरील छत काढले तर तुमचं काय होईल असा असं सूचक वक्तव्य पण यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. आमदार अभिजीत पाटील यांना हा इशारा मानल्या जात आहे. यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष मोट बांधतील का याचीही चर्चा रंगली आहे.

चूक केली मग दुरुस्ती

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन उमेदवारांना भाजपने AB फॉर्म दिला. त्यामुळे काही काळ पेच निर्माण झाला.मंद्रूप पंचायत समिती गणामधील भाजपने दोन्ही इच्छुक उमेदवारांना AB फॉर्म दिला. यावरून काही काळ गोंधळ निर्माण झाला होता . भाजपचे इच्छुक उमेदवार मळसिद्ध मुगळे आणि रेवणसिद्ध मेंडगुदले या दोघांत संभ्रम निर्माण झाला. दोन्ही उमेदवारांपैकी कोणाचा AB फॉर्म वैध हे ठरवण्यासाठी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये मळसिद्ध मुगळे यांचा अर्ज अखेर वैध ठरवण्यात आला. तर रेवणसिद्ध मेंडगुदले यांचा अर्ज अवैध ठरला.