‘सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही…’, शिवसेना नेत्याचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
उद्धव ठाकरे यांचा एकेकाळचे समर्थक असलेल्या आमदाराने त्यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. ठाकरेंच्या या भेटीवर एका शिवसेना आमदाराने खोचक शब्दांत टीका केली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर केलेल्या टीकेवर शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली. “काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही काय दिल्लीला भांडे घासायला गेलता का?” असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला. “तुम्ही दुसऱ्यांच्या गाडीवर सुपार्या टाकायला लागल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडणारच आहे. तुम्ही सुपाऱ्या फेकल्यावर त्यांनी काय बघत बसायचे का? मुळात असल्या राजकारणाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेच केली”, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. “दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असल्या राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील मिसळायला लागले आहेत”, अशी खंत शहाजीबापू पाटील यांनी केली.
“मी लहानपणापासून पाहात आलेले राजकारण सध्या राहिले नाही. या विरोधकांनी अतिशय वाईट राजकारण केले आहे. शब्दाला कोठे धार नाही, नको ती भाषा, भविष्यात फक्त आई-बहिणी वरून शिव्या देणे बाकी राहिले आहे. निवडणुकीच्या काळात जयंत पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे, आम्हाला आयाबहिणींवरून शिव्या देतील”, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला.
शहाजीबापू यांची संजय राऊतांवर खोचक टीका
“ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बसलाय नारळाच्या झाडाखाली, एका बाजूने उद्धव ठाकरेंनी, दुसऱ्या बाजूने शरद पवारांनी छत्री धरली. त्यामुळे संजय राऊत उंदराचा झालाय वाघ,” अशी खोचक टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. “संजय राऊतला बोलण्याची आणि लिखाणाची कला सापडली असल्याने त्यांनी महाराष्ट्र बिघडवायचे काम करू नये. राऊत सकाळी टीव्हीला आला की लोक टीव्हीची बटन बंद करतात. पण राऊताला वाटते की संपूर्ण महाराष्ट्र माझं ऐकतो, अशी अवस्था राऊतांची झाली आहे”, अशी खोचक टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
शहाजीबापू शरद पवारांबद्दल काय म्हणाले?
“शरद पवार हे माझे दैवत आहेत. मी आधी पवारांच्या फोटोच्या पाया पडतो आणि मग देवाच्या पाया पडतो. एवढे साहेबांना मी मानतो. पवार साहेबांनी मनात आणले तर मराठा आरक्षणाचा प्रश्न लगेच मिटेल. सगळेच नेते शरद पवार यांचं ऐकतात. मराठा नेते मनोज जरांगे हे समाजासाठी भांडता आहेत. त्यांचे सगळे मुद्दे बरोबर आहेत. आठ-आठ दिवस उपाशी राहणं सोप नाही”, अशी भूमिका शहाजीबापू पाटील यांनी मांडली.
‘विधानसभेला मुस्लिम समाज आमच्याबरोबर असणार’
“लोकसभेला काही मुद्दे चुकून त्यांच्या हाताला लागली आहेत. त्यामुळे त्यांना यश मिळालं. आताही असंच घडेल असे वाटत आहे. मात्र लोकसभा आणि विधानसभेत खूप फरक आहे. लोकसभेला मुसलमानांची मते आम्हाला पडली नाहीत. मात्र आता विधानसभेला मुस्लिम समाज आमच्याबरोबर असणार आहे”, असा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला.
