लग्नाला 8 वर्ष उलटूनही अपत्य नाही, जावयाने सासऱ्यासोबत केलं असं काही… तुमच्या पायाखालची जमीन सरकेल!
अंबाजोगाई येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एका जावयाला त्याच्या सासऱ्याच्या निर्घृण खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने धारदार शस्त्राने सासऱ्यावर २७ वेळा वार केले होते. हे खून अपत्याच्या अभावामुळे निर्माण झालेल्या कौटुंबिक कलहामुळे झाला होता.

दोन वर्षांपूर्वी आपल्या सासऱ्याचा तब्बल २७ वार करून निर्घृण खून केल्याप्रकरणी अंबाजोगाई येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जावयाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामुळे समाजात कायद्याचा धाक कायम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. लक्ष्मण फड यांनी अत्यंत प्रभावी युक्तिवाद मांडला. त्यांनी आरोपीला दोषी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडीत ही हृदयद्रावक घटना घडली होती. याप्रकरणी मृत दत्तात्रय रामा गायके यांची मुलगी रेखा हिचा विवाह रामेश्वर बळीराम गोरे यांच्याशी झाला होता. रामेश्वर गोरे हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हिंगणगाव कोथाळा या ठिकाणी राहत होते. लग्नाला आठ वर्षे होऊनही त्यांना अपत्य होत नव्हते. याच कारणावरून आरोपी रामेश्वरने दुसरे लग्न करण्यासाठी पत्नी रेखावर आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. तो वारंवार रेखाचे वडील दत्तात्रय यांच्याकडे दुसऱ्या लग्नासाठी परवानगी देण्याची मागणी करत होता. यासाठी तो त्यांना मानसिक त्रास देत होता. या कौटुंबिक कलहामुळे त्यांच्या घरात नेहमीच तणावाचे वातावरण होते.
धारदार शस्त्राने तब्बल २७ वेळा वार
याच दम्यान दत्तात्रय यांचा मुलगा मल्हारी याचे ११ जून २०२३ रोजी लग्न ठरले होते. कुटुंबात आनंदाचे क्षण असताना आरोपी रामेश्वरच्या मनात द्वेष आणि राग तसाच होता. यामुळे त्याने सासऱ्याच्या खुनाचा कट रचला. ७ जून २०२३ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो केंद्रेवाडी येथे आला. त्यावेळी दत्तात्रय हे शेतातील आखाड्यावर एकटेच झोपले होते. आरोपीने त्यांच्याबद्दल चौकशी केली. यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आखाड्यावर जाऊन धारदार शस्त्राने त्यांच्यावर तब्बल २७ वेळा वार केले. या भीषण हल्ल्यात दत्तात्रय यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात कलम ३०२ भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची जबाबदारी तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमार कुमावत यांच्याकडे सोपवण्यात आली. कुमावत यांनी घटनास्थळाचा सखोल तपास केला. त्यांनी महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले. यानंतर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या सबळ पुराव्यांच्या आधारावर आणि सरकारी वकिलांच्या प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने आरोपी रामेश्वरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने दिलेल्या या कठोर शिक्षेमुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
