दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला (SSC HSC ATKT Exam Postpone ) आहे.

दहावी-बारावीची ATKT परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची ऑक्टोबरमध्ये होणारी एटीकेटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. नुकतंच शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती दिली. (SSC HSC ATKT Exam Postpone )

दरवर्षी दहावी, बारावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेतली जाते. मात्र यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

या परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात घेतल्या जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी केली.

गेल्या काही वर्षांपासून दहावी, बारावीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी देण्यात येते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा निर्णय घेतला होता. त्यानुसार दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जुलै किंवा ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली जायची. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जात नव्हते.

पण यंदा कोरोनामुळे या परीक्षांचे निकाल जुलैमध्ये लावण्यात आले. त्यामुळे फेरपरीक्षा घेण्यात आल्या नाहीत. यामुळे  अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष वाचवण्याची संधी मिळालेली नाही. दरम्यान लॉकडाऊनमुळे दहावीची भूगोल विषयाची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना या विषयाचे सरासरी गुण देण्यात आले.

दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांंना कोरोनाचा फटका बसला आहे. याचा परीक्षा दहावी, बारावी यासह पदवी परीक्षांवर झाला आहे. त्यामुळे सध्या तरी दहावी, बारावीची फेरपरीक्षा घेतली जाणार नाही, असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. (SSC HSC ATKT Exam Postpone )

संबंधित बातम्या :  

नाशिकमधील जुळ्या बहीण भावाला दहावीत समान टक्के, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद

SSC Result 2020 | राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के, कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?

Published On - 5:50 pm, Wed, 2 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI