मविआत वातावरण तापलं, उद्धव ठाकरेंचा फोटो वापरू नका, नाहीतर.., ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा शरद पवार गटाला थेट मोठा अल्टिमेटम
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महाविकास आघाडीमध्ये वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून मोठा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पाच मतदारसंघात निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये पुणे पदवीधर मतदारसंघ, पुणे शिक्षक मतदारसंघ, छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघ, अमरावती शिक्षक मतदार संघ आणि नागपूर मतदार संघाचा समावेश आहे. दरम्यान यापैकी पुण्यातील दोनही मतदारसंघ सध्या चांगेलच चर्चेत आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघामधून निवणूक लढवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे मंगेश चिवटे हे इच्छूक होते. परंतु ऐनवेळी ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आल्याने भाजपने इथे आपला उमेदवार उभा केला, त्यामुळे शिवसेना शिंदे गटात नाराजीचं वातावरण असल्याचं बोललं जात आहे.
तर दुसरीकडे आता पुण्याच्या पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये देखील बिघाडी झाल्याचं पहायला मिळत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हर्षदा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे याच मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून सुनील मोदी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकाच मतदारसंघात मविआचे दोन उमेदवार निवडणूक लढवत असल्यानं वातावरण चांगलंच तापल्याचं पहायला मिळत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो वापरण्यावरून हा वाद निर्माण झाला असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार साहित्यावर ठाकरेंचे फोटो वापरण्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्हाचा वापर तातडीने थांबवा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा थेट इशाराच राष्ट्रवादी शरद पवार गटाला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकेड पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मंगेश चिवटे हे इच्छूक होते, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
