मुंबईत बुरखाबंदीवरून वातावरण तापलं, महाविद्यालयातच आंदोलनाला सुरुवात, पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ
गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विवेक महाविद्यालयात बुरखाबंदी हटवण्यात यावी यासाठी आंदोलनाला सुरुवात झाली होती, या आंदोलनाला एमआयएमने देखील पाठिंबा दिला होता.

मुंबईमधून मोठी बातमी समोर आली आहे, गोरेगावमधील कॉलेजमध्ये बुरखाबंदीवरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. विवेक महाविद्यालयात याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे, एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख या देखील या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. बुरखाबंदी हटवण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान हे आंदोलन सुरू असतानाच आता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. कॉलेज परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आज सकाळपासूनच या आंदोलनाला सुरुवात झाली होती, बुरखाबंदी हटवण्याची मागणी करण्यात येत होती, विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं, मात्र आता या सर्व विद्यार्थिनी आपल्या घरी गेल्या आहेत. कॉलेजामध्ये जी बुरखाबंदी लागू करण्यात आली आहे, ती मागे घ्या अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.
या आंदोलनाला एमआयएमकडून देखील सपोर्ट करण्यात आला होता. एमआयएमच्या नेत्या जहांआरा शेख या देखील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, दरम्यान एमआयएमनंतर आता मनसेचे कार्यकर्ते देखील या कॉलेजामध्ये पोहोचले आहेत, मात्र या आंदोलनानंतर आता कॉलेजच्या गेटवरच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच ज्यांचं आंदोलन सुरू होतं, त्या आंदोलकांना देखील इथून आता हटवण्यात आलं आहे.
मनसेची भू्मिका काय
दरम्यान याबाबत बोलताना मनसे पदाधिकाऱ्याने सांगितले की, ही शाळा आहे, इथे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात, त्यामुळे इथे अशा गोष्टी होता कामा नये, आम्ही कोणत्याही जाती-धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण या ठिकाणी शाळेत शिकण्यासाठी लहान-लहान आकरावी -बारावीचे विद्यार्थी येतात त्यांनी अशा गोष्टी करू नये. तुम्ही जर स्कार्प बांधून आला तर सुरक्षारक्षक तुम्हाला कसं ओळखणार? तुम्ही विद्यार्थीच आहात म्हणून, यामुळे परीक्षेत देखील गैर प्रकार होऊ शकतात. त्यामुळे शाळेच्या ठिकाणी अशा गोष्टी होऊ नये, याला आमचा विरोध असल्याचं मनसेनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे मात्र आंदोलकांनी बुरखाबंदी मागे घ्यावी अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे काही काळ या परिसरात वातावरण चांगलंच तापलं होतं.
