बुलडाण्यात माजी सरपंच महिलेची स्वतःचं सरण रचून आत्महत्या

बुलडाण्यात माजी सरपंच महिलेची स्वतःचं सरण रचून आत्महत्या

बुलडाणा : माजी सरपंच महिला शेतकऱ्याने स्वतःचं सरण रचून आत्महत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात घडली आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 55 वर्षीय आशा इंगळे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. अशा पद्धतीने आत्महत्या करण्याची राज्यातील ही गेल्या दहा दिवसातील दुसरी घटना आहे.

आशा इंगळे यांनी शेतातील गोठ्यात स्वतःचं सरण रचून त्यावर जाळून घेतलं. त्यांच्याकडे साडेतीन एकर शेती होती. मात्र सततची नापिकी आणि यामुळे डोक्यावर कर्जाचा झालेला डोंगर आणि यामुळे आर्थिक परिस्थिती खालावत गेली.

जिल्हा बँकेचं 80 हजाराचं कर्ज, नातेवाईकांचे उसने पैसे यामुळे जगणे मुश्किल झालं होतं. या तणावात आशा इंगळे यांनी काल शेतातील गायीच्या गोठ्यात सरण रचून स्वतःला जाळून घेतलं. बाजूच्या लोकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिल्यावर हे लक्षात आलं, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

आशा इंगळे या धोत्रा भनगोजी या गावच्या माजी सरपंचही आहेत. या घटनेने गावात शोकाकूल वातावरण पसरलं आहे.

दरम्यान, या पद्धतीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची गेल्या दहा दिवसातली ही दुसरी घटना आहे. नांदेड जिल्ह्यातील तुराटी गावच्या शेतकऱ्याने स्वतःचं सरण रचून घेत आत्महत्या केली होती.

आत्महत्या केलेले शेतकरी पोत्तना यांच्यावर बँकेचं कर्जही होतं. त्यातच दुष्काळ आणि नापिकी तर पाचवीला पूजलेली. अशात दिवाळसणही आल्याने खचलेल्या पोत्तना यांनी स्वत:चं सरण रचून पेटत्या चितेत उडी घेऊन आयुष्य संपवलं.

सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे, शिवाय कर्जमाफीचीही घोषणा यापूर्वीच झाली आहे. तरीही शेतकरी आत्महत्या होत असल्याने, सरकारी योजनांची अंमलबजावणी होते की नाही असा प्रश्न पडला आहे.

पोत्तना यांच्या डोक्यावर बँकेचे कर्ज होते. ते कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागली होती. कर्जमाफीच्या गोंधळामुळे त्यांना बँकेने कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे उसनवार करुन त्यांनी पेरणी केली. परंतु पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली. याच परिस्थितीत त्यांनी स्वत:चं सरण रचून आत्महत्या केली.

संबंधित बातमी : कर्जामुळे शेतकऱ्याची स्वतःचं सरण रचून आत्महत्या, मग कर्जमाफी कुणाला मिळाली?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI